Bike Burnt Case : मध्यरात्री ‘तो’ आला अन् गाड्या पेटवून पळाला; पाडळी आळे गावात नेमकं घडलं काय? पाहा
Bike Burnt Case : पाडळी आळे गावात वारंवार घडताहेत जळीत कांडाच्या घटना; मध्यरात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी.

Bike Burnt Case – जुन्नर आणि पारनेर तालुक्यांच्या शिवेवर असलेल्या पाडळी आळे गावात अज्ञात व्यक्तीकडून महागड्या मोटरसायकली जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच वेळी दोन दुचाकी पेटवून दिल्याच्या या घटनेमुळे गावात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गावातील विजय प्रकाश थोरात आणि प्रकाश बारकू थोरात हे आपल्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराबाहेर असलेल्या टीव्हीएस रायडर आणि हिरो स्प्लेंडर या दोन दुचाकींना आग लावली. या आगीत दोन्ही गाड्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, गाड्या जळत असतानाचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
यापूर्वीही गावात अशाच प्रकारच्या घटना घडल्याने हा प्रकार पूर्वनियोजित असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला असून, लवकरच त्याला ताब्यात घेण्याचे संकेत दिले आहेत. गावातील शांतता राखण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





