पुणे | नवले पुलाखालील चौक सिग्नलमुक्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी नवले पुलाखालील चौक सिग्नलमुक्त करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. सर्व बाबींचा अभ्यास करून, सिग्नलमुक्त चौक आणि वाहतुकीसाठी योग्य रचना करण्यात येणार आहे.
नवले पूल परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. सकाळी आणि सायंकाळनंतर वाहनांच्या रांगा लागतात.
त्यामुळे परिस्थिती सुधारण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर होते. नवले पूल परिसरातील वाहतुकीची प्रत्यक्ष पाहणी, व्हिडिओ चित्रण आणि फोटोंद्वारे वाहतूक पोलीस अधिकारी आणि तज्ज्ञांनी अभ्यास केला. त्यात कोंडीमागील कारणे शोधण्यात आली.
तसेच, काय उपाययोजना करता येतील, याचा अभ्यासही केला आहे. त्यातून सिग्नल मुक्त चौक संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
अशी असेल नवीन मार्ग रचना
– नऱ्हेकडून येऊन वडगाव पुलाकडे जाणारी वाहने सरळ जातील.
– कात्रजकडून नऱ्हे किंवा वडगावकडे जाणारी वाहनेही विनाअडथळा मार्गस्थ होतील.
– वडगावकडून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांना चौकातून डावीकडे वळून जाता येईल.
– वडगावकडून भुमकर चौक- नऱ्हेकडे जाणाऱ्यांना कात्रज मार्गिकेवर जाऊन साधारण शंभर मीटर अंतरावर उजवीकडून यू-टर्न घ्यावा लागेल. तेथून ते पुन्हा नवले पूल चौकात येऊन नऱ्हेकडे जातील. त्यासाठी सुमारे शंभर मीटर अंतरावर एक सिग्नल नव्याने उभारण्यात येणार आहे.





