वाघोलीत अवकाळी पावसाचा तडाखा; रस्त्यांवर पाणीच पाणी, वाहतूक कोंडी

वाघोली: वाघोली आणि परिसरात सोमवारी (दि. १९) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सलग एक ते दीड तास कोसळलेल्या धोधो पावसामुळे सर्वच रस्त्यांवर पाणी साचले, तर पुणे-नगर रोडवर मोठ्या प्रमाणात जलमय परिस्थितीमुळे वाहतूक कोंडी झाली. अचानक आलेल्या या पावसाने मोठी तारांबळ उडाली.
पावसासोबतच जोरदार वादळी वाऱ्यामुळे वाघोलीतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले. पुणे-नगर रोडवरील पाण्याचा निचरा न झाल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागली. याशिवाय, वादळामुळे काही ठिकाणी झाडपडीच्या घटनाही घडल्या.
वाघोली परिसरातील गटारी आणि नाले यांच्या अपुऱ्या स्वच्छतेमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाकडून पाहणी सुरू असल्याचे समजते.





