जामखेड-सौताडा महामार्गाची दुरवस्था: खर्डा चौकात तळे, ट्रॅफिक जाममुळे पोलिसही हतबल

जामखेड : जामखेड-सौताडा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांसह आता पोलिसांच्याही जीवावर बेतू लागले आहे. बीड रोड कॉर्नर ते खर्डा चौक दरम्यान गेल्या तीन वर्षांपासून थांबलेल्या कामामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम आणि पावसामुळे रस्त्यावर तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वाहतूक पोलिस हतबल झाले आहेत. रस्त्याचे काम जाणीवपूर्वक रखडवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
खर्डा चौकात चिखल आणि ट्रॅफिकचा त्रास –
जामखेड-सौताडा महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि राजकीय अनास्थेमुळे हे काम प्रलंबित आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे खर्डा चौकात गुडघाभर पाणी साचले असून, रस्ता तळ्यासारखा झाला आहे. अरुंद रस्त्यामुळे बीड रोड ते खर्डा चौकापर्यंतचा प्रवास ३० मिनिटांहून अधिक वेळ घेत आहे. यामुळे व्यापारी, प्रवासी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात धुळीचा आणि पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे.
पोलिसांनाही नाकीनऊ –
दरम्यान, १६ मे रोजी खर्डा चौकात प्रचंड ट्रॅफिक जाम झाल्याने जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. सततच्या ट्रॅफिक जाममुळे वाहतूक पोलिसांचेही कंबरडे मोडले आहे. “हा महामार्ग आता नागरिकांसह पोलिस प्रशासनालाही त्रासदायक ठरत आहे,” अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली.
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षावर टीका –
या रस्त्याच्या प्रश्नावर अनेकदा बैठका झाल्या, परंतु ठोस निर्णय झाला नाही. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार नीलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांना या समस्येची पूर्ण जाणीव असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. “लोकप्रतिनिधींनी याकडे का दुर्लक्ष केले आहे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. माध्यमांनीही हा मुद्दा वारंवार मांडला, परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कोणतीही प्रगती झालेली नाही.
नागरिकांचा संताप –
खर्डा चौकातील अपूर्ण काम आणि ट्रॅफिक जाममुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. “तीन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. पावसात रस्त्यावरून चालणेही अशक्य झाले आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कोणाची वाट पाहत आहे?” असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. या महामार्गाच्या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.





