Traffic News : सलग सुट्ट्यांमुळे अनेक महामार्गांवर वाहतूक कोंडी; नागरिकांचे झाले हाल !

Traffic News : मे महिन्याच्या आरंभी सार्वजनिक सुट्टी, आठवडाअखेर अशा सलग सुट्ट्यांमुळे मुंबई, पुणे, नाशिक शहरालगतच्या महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी रात्रीच्या प्रवासाला पसंती दिल्याने शहरात रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडी दिसून आली.
मुंबई-पुणे, नाशिक, गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा असल्याने प्रवाशांना कोंडीतूनच मार्ग काढावा लागत होता. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा वाढल्याने रात्रीच्या प्रवासाला प्रवाशांची पसंती वाढत आहे.
रात्रीच्या वेळी धावणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्या, खासगी बसगाड्या, राज्य परिवहनच्या (एसटी) विशेष आणि नियमित रेल्वेगाड्या अशा सर्वांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.
नियमित वगळता मागणीनुसार चालवण्यात येणाऱ्या खासगी बसगाड्या, खासगी टुरिस्ट वाहने रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगतीसह शीव-पनवेल, नाशिक महामार्ग, अहमदाबाद महामार्ग अशा शहराबाहेर जाणाऱ्या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे अनेकांनी सांगितले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा-खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या ८ ते १० किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. घाटमार्ग पार करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ अपेक्षित असतो.
कोंडीमुळे घाट मार्ग पार करण्यासाठी २ ते ३ तास लागत होते. मुंबई-पुणेदरम्यान निर्माणाधीन असलेला मिसिंग लिंक प्रकल्प तातडीने पूर्ण करावा आणि वाहतुकीसाठी खुला करून द्रुतगती मार्गावरील कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करावा, अशी प्रतिक्रिया खासगी बसचालकाने दिली.





