जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच शहरातील पिंप्राळा परिसरात हवेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र हा प्रकार राजकीय नसून वैयक्तिक वादातून घडल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नेमकी घटना काय? पिंप्राळा भागातील आनंद मंगल नगर परिसरात दोन तरुणांमध्ये जुन्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात एका तरुणाने आपल्याकडील शस्त्रातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच पळापळ झाली. मतदानाचा दिवस असल्याने ही घटना निवडणुकीशी संबंधित असल्याची अफवा पसरली, ज्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. “हा गोळीबार दोन व्यक्तींमधील खाजगी वादातून झाला आहे. याचा निवडणूक प्रक्रियेशी कोणताही संबंध नाही,” असे स्पष्टीकरण डॉ. रेड्डी यांनी दिले. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत या घटनेनंतर संवेदनशील भागांत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गोळीबाराच्या घटनेचा मतदानावर कोणताही परिणाम झाला नसून, केंद्रांवर मतदारांचा उत्साह कायम होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून शांततेत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.