बुलढाणा: आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार, पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी

मुंबई – बुलढाण्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी निर्दयी लाठीमार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी जिल्हा पोलिस अधिकक्षकांना निलंबीत करावे, अशी मागणी महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या लाठीमाराच्या घटनेची राज्य विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही पटोले यांनी केली.
एकनाथ शिंदे-भारतीय जनता पक्षाच्या सरकारला शेतकरी धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा, पीक विम्यापासून वंचित राहिलेल्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत असताना बुलढाणा पोलिसांनी शनिवारी त्यांच्यावर “अमानुष लाठीमार” केल्याचा आरोप पटोले यांनी केला.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांनाही पोलिसांनी अडवले, असेही पटोले यांनी म्हटले आहे. लोकशाही राज्यात मागण्यांसाठी आंदोलन करणे गुन्हा आहे का? लाठीमार करण्याची काय गरज होती? शिंदे-फडणवीस सरकारची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे असे पटोले म्हणाले.





