satara | कराडमधील दोघे सातारा, सांगली जिल्ह्यातून तडीपार

कराड, (प्रतिनिधी) – कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रशांत ऊर्फ परशुराम रमेश करवले (वय 23, रा. कृष्णा घाट, सोमवार पेठ, कराड) व निशिकांत निवास शिंदे (वय 21, रा. रेठरेकर कॉलनी, कराड) यांना सातारा आणि सांगली जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
या दोघांविरुद्ध दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी करणे, बेकायदा पिस्तूल बाळगणे, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, गर्दी करून मारामारी करणे, असे गंभीर गुन्हे कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
या दोघांना संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव, आटपाडी या तालुक्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी हद्दपार प्राधिकरणाकडे सादर केला होता.
पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी या प्रस्तावाची चौकशी केली होती. हा प्रस्ताव मंजूर करून, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दोघांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.
सरकार पक्षाच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी हद्दपार प्राधिकरणापुढे पुरावे सादर केले.





