पुण्यातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र थांबेना; वेल्ह्यातून तिघांना अटक, रहिवाशांमध्ये घबराट

Pune | पुण्यात मागील काही दिवसांपासून वाहनांच्या तोडफोडीच्या घटना समोर येत आहे. हे सत्र अद्यापही सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. बिबवेवाडीतील अपर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, राजीव गांधीनगर परिसरात दहशत माजविण्यासाठी तिघांनी जवळपास २५ ते ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली. पहाटे पावणे तीन वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे, यामुळे रहिवाशांमध्ये घबराट उडाली.
बिबवेवाडीमध्ये घरासमोर आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करत टोळक्यांनी दुचाकी, टेम्पो, रिक्षांची दांडक्याने तोडफोड केली. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. टोळक्याने शिवीगाळ करुन दहशत माजविली. वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केला. टोळके तेथून पसार झाले.
या घटनेमुळे हातावर पोट असलेल्या लोकांच्या वाहनांचे नुकसान झाले असून नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी या तीन समाजकंटकांना वेल्हा तालुक्यातील सापेगाव येथून अटक केली आहे.





