भाजपवर नाराज असल्याचे दावे संघाने फेटाळले

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळाले नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या संख्याबळानुसार दोन मोठ्या राज्यांमध्ये भाजपची मोठी पिछेहाट झाली. निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या वर्षभरापासून जळत असलेल्या मणिपूर या राज्याबद्दल वक्तव्य केले.
त्यांनी कोणाचेही नाव ने घेता भारतीय जनता पार्टीच्या सर्वोच्च नेतृत्वाला कानपिचक्या दिल्या. तेंव्हापासून सत्तेच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले. आजच संघाचे आणखीन एक वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनीही भाजपला आरसा दाखवला. त्यामुळे संघ भाजपवर नाराज असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. तथापि, संघाने याचा इन्कार केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एनडीएचे सरकार अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज नसल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले आहे. मणिपुरच्या संदर्भात संघाकडून पूर्वीही विधाने केली गेली आहेत. मात्र सरकार अथवा पंतप्रधानांबाबत संघाकडून काही म्हटले गेलेले नाही असे संघाने म्हटले असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
काय म्हणाले होते भागवत?
सगळे मीच केले आहे असा अहंकार असू नये असे मोहन भागवत यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानातून अनेक अर्थ काढता येऊ शकतात. त्यांनी थेट कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता असा आता सार्वत्रिक समज आहे. एका संकेतस्थळाच्या दाव्यानुसार लोकसभा निवडणुका अथवा आपल्या अन्य सगळ्यांच भाषणात मोदी यांच्याकडून सातत्याने स्वत:चा उल्लेख केला जातो. त्याला संघाचा आक्षेप असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
त्याहीपेक्षा पुढे म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दाही संघाच्या नाराजीमागचे कारण असू शकते. गेल्या दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक राजकारण केले आहे. त्यात त्यांनी राष्ट्रवादाचा मुद्दाही समाविष्ट केला. मात्र हे करत असताना सगळेच मोदी केंद्रीतही झाले आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा पर्याय म्हणजे नरेंद्र मोदीच अशीच मांडणी झाली आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी सगळे विधी मोदींनीच केले होते. त्यावेळीही अनेक धर्माचार्यांकडून नाराजीचा सूर उमटला होता. आता या सगळ्याचे पडसाद उमटले असल्याचे मानले जाते आहे.





