‘द साबरमती रिपोर्ट’ भाजपशासित सहा राज्यांमध्ये करमुक्त

नवी दिल्ली – गुजरातमध्ये २००२ साली गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या अग्निकांडावर बेतलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉलिवुड अभिनेता विक्रांत मॅसीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे.
काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री देखील करण्यात आला आहे. यामध्ये आता उत्तर प्रदेशची देखील भर पडली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमध्ये देखील हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ केल्याची घोषणा केली आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयानंतर ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट भाजपाची सत्ता असलेल्या सहा राज्यात टॅक्स फ्री झाला आहे. यापूर्वी हरियाणा, राजस्थान, छत्तिसगड, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांमध्येदेखील हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, लखनऊ येथे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी एका स्पेशल स्क्रिनींगदरम्यान काही कॅबिनेट मंत्र्यांबरोबर ‘द साबरमती रिपोर्ट’हा चित्रपट पाहीला. यावेळी अभिनेता विक्रांत मॅसी आणि चित्रपटाशी संबंधीत इतरही काहीजण उपस्थित होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशामध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली.





