Pune District : रोडे कुटुंबाकडून स्मशानभूमीला पाच लाख रुपयांचे छत
Pune District : कै. धोंडीभाऊ नाथू रोडे यांच्या निधनाला नुकतेच दहा दिवस पूर्ण झाले होते. त्यांच्या दशक्रिया विधीच्या वेळीच या स्मशानभूमी शेडचे समाजाला समर्पण करण्यात आले.

पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथील रोडे परिवाराने दुःखाच्या प्रसंगाला समाजसेवेची जोड देत एक आदर्श सामाजिक उपक्रम राबविला आहे. कै. धोंडीभाऊ नाथू रोडे पाटील, कै. लक्ष्मीबाई रोडे पाटील आणि कै. अनिल धोंडीभाऊ रोडे पाटील यांच्या स्मरणार्थ रामदास धोंडीभाऊ रोडे पाटील (सर) यांच्या वतीने लाखणगाव येथील स्मशानभूमीत तब्बल पाच लाख रुपये खर्च करून ३५ बाय ६५ फूट आकाराचा भव्य मंडप तीन-चार दिवसात उभारण्यात आला आहे. हा मंडप समाजहितासाठी व सार्वजनिक वापरासाठी समर्पित करण्यात आला.
कै. धोंडीभाऊ नाथू रोडे यांच्या निधनाला नुकतेच दहा दिवस पूर्ण झाले होते. त्यांच्या दशक्रिया विधीच्या वेळीच या स्मशानभूमी शेडचे समाजाला समर्पण करण्यात आले. आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती कायम जपण्यासाठी समाजाच्या उपयोगी पडणारे सार्वजनिक काम करण्याचा रोडे परिवाराचा निर्णय विशेष कौतुकास्पद ठरला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेनेचे नेते व उद्योजक रमेश येवले, महेंद्र वाळुंज, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अनिल डोके, सतीश रोडे पाटील, भारतशेठ पडवळ, नरेंद्र भागवत, विशाल वाबळे, गोविंद खांडगे, लहू पडवळ, मार्तंड टाव्हरे, महादेव कानसकर, प्रशांत वांळुज, किसन टाव्हरे आदी मान्यवर व ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच खोगले रामदास धोंडीभाऊ रोडे
मृत्यू हा प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत दुःखद प्रसंग असतो. मात्र, या दुःखातूनही समाजासाठी काहीतरी विधायक करण्याचा संदेश आम्ही उपक्रमातून दिला आहे. स्मशानभूमीत अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी हा प्रशस्त मंडप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. लाखणगाव गावातील नागरिकांच्या गरजेचा विचार करून उभारण्यात आलेल्या या मंडपामुळे स्मशानभूमीला आवश्यक सुविधा उपलब्ध झाली असून, भविष्यात त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा मंडप केवळ बांधकाम नसून सामाजिक बांधिलकीचे आणि समाजऋण फेडण्याच्या भावनेचे प्रतीक ठरणार आहे.





