पिंपरी | महिन्याभरापूर्वी बनविलेला रस्ता उखडला

देहूगाव, (वार्ताहर) – देहू नगरपंचायत हद्दीतील विठ्ठलनगर येथील ठाकर वस्ती येथे महिन्याभरापूर्वी तयार केलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता जेसीबी ब्रेकरच्या सहाय्याने उखडण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासह नगरसेवकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
ठाकर वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर नुकतेच सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. परंतु रस्त्याजवळ असणाऱ्या शौचालयाचे भूमिगत पाइप टाकण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या वादामुळे ठेकेदाराने संपूर्ण रस्ता जेसीबीच्या सहाय्याने उखडला आहे. मात्र, हा रस्ता उखडल्यानंतर नव्याने वाद निर्माण झाला आहे.
लोकप्रतिनिधींच्या मध्यस्तीमुळे वादावर पडदा पडला असला तरीही झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण? जनतेच्या पैशाची उधळपट्टी कधी थांबणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
यासह रस्ता बनविण्यास प्रशासनाने कामाला तांत्रिक मंजुरी दिली होती का, याचीही चर्चा होत आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी निवेदिता घार्गे आणि बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
दर्जाहीन काम केल्याने रस्ता उखडला –
संबधित ठेकेदाराने बनविलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा होता. म्हणून तो रस्ता उखडायला लावून त्याच ठेकेदाराने पुन्हा एकदा स्वखर्चाने रस्ता करून द्यायचा, असे ठरले आहे, अशी माहिती बांधकाम समिती सभापती योगेश परंडवाल यांनी दिली.
दरम्यान, काही नागरिकांच्या राजकारणामुळे हा रस्ता पूर्णपणे उखडण्यात आला आहे. याप्रकरणी नगरपंचायतीने संबधित व्यक्ती आणि रस्ता उखडण्यासाठी वापरण्यात आलेल्या मशीन मालकाविरोधात तक्रा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळोखे यांनी केली आहे.
ठाकर वस्तीत शैचालय बनविण्यात आले आहे. त्यासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी ३ फूट रस्ता उखडून पाइप टाकल्यावर पुन्हा रस्ता बनवावा, असे सांगण्यात आले होते.
परंतु संबधित ठेकेदाराने संपूर्ण रस्ताच उखडून टाकला. आता हा रस्ता ठेकेदाराने पुन्हा करून घ्यायचा आहे. येथील नागरिकांची १० फुटी रस्त्याची मागणी आहे. नगरपंचायत प्रशासन याबाबत लवकरच निर्णय घेईल. – पूजा दिवटे, नगराध्यक्षा, देहू नगरपंचायत





