Garbage Depot Fire : देहू नगरी धुराच्या विळख्यात! कचरा डेपो पुन्हा पेटला; संशयाची साखळी गडद
Garbage Depot Fire : रिंगरोडवर वाहनचालकांची मोठी कसरत; दाट धुरामुळे दृश्यमानता घटल्याने अपघाताचे सावट, प्रशासनाकडून ठोस कारवाईची प्रतीक्षा.

Garbage Depot Fire – देहू नगरपंचायतीच्या कचरा डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात सापडला असून, शहर अक्षरशः धुरात हरवले असल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे. दाट धुरामुळे वाहनचालकांना रस्ते दिसेनासे होत असून मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या सततच्या घटनांमुळे आग अपघाती लागते की जाणीवपूर्वक लावली जाते, असा गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपंचायतीच्या हद्दीतील बाह्यवळण मार्गालगत असलेल्या खाणीमध्ये हा कचरा डेपो उभारण्यात आला आहे. शहरातील आणि बाहेरून येणारा कचरा येथे टाकला जातो. कचरा टाकण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, देखरेखीसाठी कर्मचारीही नेमण्यात आले आहेत. मात्र, या सर्व व्यवस्थेनंतरही डेपोमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून डेपोमध्ये आग धगधगत असून, ती पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमन दल, पाण्याचे टँकर आणि जेसीबीच्या सहाय्याने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तरीदेखील आग पुन्हा पुन्हा भडकत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे. सोमवारी (दि. २०) सायंकाळी आग चारही बाजूंनी पसरताच धुराचे प्रचंड लोट संपूर्ण परिसरात पसरले. यामुळे लगतच्या बाह्यवळण रिंगरोडवरून जाणाऱ्या वाहनांना रस्ता दिसेनासा झाला.
या धुरामुळे काही ठिकाणी वाहनचालकांना गाडी थांबवावी लागल्याचेही दिसून आले. विशेष म्हणजे, डेपोवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि कर्मचारी असतानाही आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आग विझवण्यासाठी दरवेळी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, पाणी, यंत्रसामग्री आणि डिझेल खर्च केला जातो.
या घटनेमुळे केवळ वाहतूकीवरच नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. धुरामुळे श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव यांसारख्या तक्रारी वाढत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. शहरातील हवा प्रदूषित होत असून, पर्यावरणीय संतुलन बिघडत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.




