आळंदी – श्रावण महिन्याचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण नागपंचमी, तीर्थक्षेत्र आळंदीत मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. समाजात नाग या जीवाबद्दल आदर, श्रद्धा आणि पूज्य भावना निर्माण व्हावी, या हेतूने वेदकाळापासून चालत आलेली ही परंपरा आजही अखंडपणे जपली जात आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने नागदेवतेची सनई चौघड्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.ही मिरवणूक जुन्या नगरपरिषदेच्या परिसरात विधीवत पूजन करून प्रारंभ झाली. पूजनकार्य माउलींच्या सेवेत असणार्या आळंदीतील मानकरी कुटुंबांतील महिला सदस्यांनी पार पाडले. यामध्ये कुर्हाडे पाटील, घुंडरे पाटील आणि चिताळकर पाटील घराण्यांतील महिला सहभागी होत्या.नागदेवतेस दूध, साखर, लाह्या, आघाडा, दुर्वा अर्पण करत भक्तांनी पारंपरिक विधीने पूजा अर्पण केली. यानंतर नागदेवतेची पालखी लक्ष्मी नारायण मंदिर, राम मंदिर परिसरात नेण्यात आली. पुढे ती माऊलींच्या मंदिरातील पालखी मंडपात नेण्यात आली. या ठिकाणी विशेष पूजन, अभिषेक व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. मंदिर समितीच्या वतीने पूजेसाठी योगदान देणार्या मानकरी महिलांचा गौरव म्हणून त्यांना नारळ व प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये पुष्पा चिताळकर पाटील, रेखा कुर्हाडे पाटील, ज्योती चिताळकर पाटील, राजश्री कुर्हाडे पाटील, सृष्टी घुंडरे पाटील, लक्ष्मी कुर्हाडे पाटील, परिणिती कुर्हाडे यांचा समावेश होता. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कुर्हाडे पाटील, विठ्ठल घुंडरे पाटील, भीमाशंकर वाघमारे, बारकू वाघमारे, पुरुषोत्तम वाघमारे आदी उपस्थित होते. नागपंचमीचा हा पारंपरिक सण, आळंदीत भक्ती, समर्पण आणि सामाजिक सहभाग यांचे प्रतीक ठरला. श्रद्धाळू नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. नागदेवतेच्या पूजनासह, संत परंपरेचा वारसा पुढे नेणार्या आळंदीतील या धार्मिक सोहळ्याने सणाच्या पावित्र्यात भर घातली.