पुणे | राष्ट्रपतींना करावा लागणार खड्ड्यांचा सामना?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २ आणि ३ सप्टेंबर या दोन दिवशी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे लोहगाव विमानतळ ते राजभवनपर्यंतचे रस्ते तातडीने दुरुस्त करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात गणेशखिंड रस्त्याचाही समावेश आहे.
मात्र, या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महापालिकेने खड्डे दुरुस्ती करण्यासाठी पीएमआरडीएला पत्र दिले असून, या पत्रावर त्यांच्याकडून महापालिकेस काहीच प्रतिसाद मिळालेला नाही.
त्यामुळे दौऱ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिकेची चांगलीच कोंडी होणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील आठवड्यातच राज्यपाल यांच्या दौऱ्यापूर्वी देखील पीएमआरडीएला या भागातील खड्डे तातडीने बुजविणे,
तसेच खचलेले चेंबर हे रस्त्यांच्या समपातळीत घेण्यासंदर्भात कळविण्यात आले होते; परंतु ते कामही अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यामुळे या दोन्ही विभागांतील समन्वयाचा अभाव चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
भीतीपोटी पालिकेनेच सुरू केले काम
गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौकातील दुहेरी उड्डाणपूल पाडण्यात आला आहे. या चौकात मेट्रो, ग्रेडसेपरेटर व उड्डाणपुल असे प्रस्तावित करण्यात आले आहे.
सध्या गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो व विद्यापीठ चौकात दुहेरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी पीएमआरडीए व मेट्रो प्रकल्पाचे काम करणार्या कंपनीची आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याची जबाबदारीही पीएमएआरडीएची असून, तात्काळ खड्डे बुजविण्याचा सूचना महापालिकेच्या पथ विभागाने केली आहे. मात्र, या पत्राला पीएमएआरडीएने थेट केराची टोपली दाखविली आहे.
त्यामुळे भीतीपोटी पथ विभागानेच स्वत:हून गणेशखिंड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, या कामाचे बिल पीएमआरडीकडून वसूल केले जाणार असल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केले.





