Pune News – महापालिकेकडून गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या रस्त्यावर पुणे विद्यापीठ चौकात बहुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी हा रस्ता ४५ मीटर रुंद करण्यात आला असला, तरी शिमला ऑफिस चौक आणि संचेती हॉस्पिटल चौकात मेट्रोचे स्थानक तसेच मेट्रोचे खांब रस्त्यातच असल्याने या दोन्ही चौकांत वाहतुकीची ‘बॉटलनेक’ स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच, विद्यापीठ चौकातील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या कोंडीत भर पडणार आहे.त्यामुळे महापालिकेकडून विद्यापीठ रस्त्याने आलेली वाहने कृषी महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जुना पुणे–मुंबई महामार्ग तसेच संगमवाडीकडे जाण्यासाठी नवीन वाय-आकाराचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर संकुलपासून पुढे न. ता. वाडीच्या भुयारी मार्गावरून हा पूल जाणार आहे. या पुलासाठी सुमारे ७५ कोटींचा खर्च अपेक्षित असून महापालिकेच्या अंदाज समितीमध्ये या पुलास मान्यताही देण्यात आली आहे.या पुलामुळे शिमला ऑफिस चौक आणि संचेती हॉस्पिटल चौकातील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. प्रशासनाकडून त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प विभागाकडून देण्यात आली. मेट्रोने वाढविली कोंडी कृषी महाविद्यालय ते संचेती हॉस्पिटलपर्यंत आधीच असलेला उड्डाणपूल आणि त्यानंतर मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. फर्गसन रस्त्याने तसेच बाजीराव रस्त्याने शिमला ऑफिसकडे येणारी वाहने जुना पुणे–मुंबई महामार्ग तसेच पुणे स्टेशनकडे जाण्यासाठी या दोन्ही चौकांत येतात. या रस्त्यावर आधीच राहुल सिनेमासमोर उड्डाणपूल आहे. त्यानंतर लगेच आकाशवाणीसमोर मेट्रो मार्ग क्रमांक ३ चे स्थानक आहे. पुढे रस्त्याच्या मधोमध संचेती हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेट्रोचे खांब आहेत. परिणामी, या रस्त्याची वहन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही चौकांत दिवसभर कोंडी असते.साखर संकुलकडून जुना पुणे–मुंबई महामार्गाकडे जायचे असल्यास या भुयारी मार्गातून केवळ दुचाकी वाहने जात असल्याने चारचाकी वाहनांना संचेती चौकातूनच जावे लागते. त्यामुळे महापालिकेने या भुयारी मार्गाच्या वरील बाजूस उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला असून तो वाय-आकाराचा असेल. हा पूल साखर संकुलसमोरून थेट जुना पुणे–मुंबई महामार्ग तसेच संगमवाडीकडे जाण्यासाठी स्वतंत्र लेनचा असेल. तर भुयारी मार्ग केवळ शहरात येण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.