President Droupadi Murmu – भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राष्ट्रवादाची भावना देशाच्या एकतेचा एक मजबूत पाया आहे. भारत आत्मनिर्भर होत आहे. जागतिक स्तरावर अनिश्चितता असूनही भारताचा वेगाने विकास होत आहे, अशा विविध मुद्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाष्य केले आहे. ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, हा उत्सव देशवासियांमध्ये राष्ट्रीय एकता आणि अभिमानाची भावना दृढ करतो. द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, यावर्षी प्रजासत्ताक दिनासोबतच वंदे मातरम् ला १५० वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सवही साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा हा पवित्र दिवस आपल्याला देशाच्या भूतकाळावर, वर्तमानावर आणि भविष्यावर विचार करण्याची आणि समजून घेण्याची संधी देतो. काळानुसार आपल्या देशाची स्थिती बदलली आहे. भारत स्वतंत्र झाला आणि आपण स्वतः आपल्या देशाचे भविष्य ठरवणारे बनलो. देशाच्या विकासात महिलांचा सहभाग वाढला आहे. ५७ कोटी जन-धन खात्यांपैकी ५६ टक्के खाती महिलांची आहेत. १० कोटींहून अधिक स्वयं-सहायता गट आहेत. खेळामध्ये आपल्या मुलींनी विक्रम केले आहेत. महिला क्रिकेट संघाने आयसीसी क्रिकेट विश्वचषक, ब्लाइंड विश्वचषक जिंकला आहे. नारी शक्ती कायद्यामुळे देशातील महिला आणखी सशक्त होतील. आपल्या परंपरेत नेहमीच संपूर्ण सृष्टीत शांतता राखण्याची प्रार्थना केली जात आहे. जर जगात शांतता असेल तरच मानवतेचे भविष्य सुरक्षित राहील. आज जेव्हा जगाच्या अनेक भागांमध्ये अशांतता पसरली आहे, अशा वेळी भारत शांतता आणि बंधुत्वाचा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचवत आहे. आपले पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान देशाच्या अंतर्गत संरक्षणासाठी तत्पर असतात. आपले सेवाभावी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी देशवासीयांची सेवा करतात. आपले अभियंते देशाच्या विकासात भूमिका बजावतात. आपले देशाचे संवेदनशील नागरिक देशाला सशक्त बनवत आहेत. शेतकऱ्यांच्या जोरावर कृषी उत्पादने परदेशात पाठवली जात आहेत. वंचित वर्गाच्या योजनांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. महिलांचे सक्रिय आणि सक्षम असणे देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यांच्या आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी केल्या जात असलेल्या राष्ट्रीय प्रयत्नांमुळे अनेक क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. गेल्या वर्षी आपल्या देशाने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ला केला. दहशतवादाचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. अनेक दहशतवाद्यांना त्यांच्या अंतापर्यंत पोहोचवण्यात आले. भूदल, वायुदल आणि नौदलाच्या शक्तीच्या आधारावर आपल्या सुरक्षा-क्षमतेवर देशवासीयांचा पूर्ण विश्वास आहे. पर्यावरण संरक्षण ही आजची अत्यंत महत्त्वाची प्राथमिकता आहे. पर्यावरणाशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये भारताने जागतिक समुदायाला मार्गदर्शन केले आहे, याचा मला अभिमान आहे. निसर्गाशी सुसंवाद साधणारी जीवनशैली ही भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग राहिली आहे. हीच जीवनशैली, जागतिक समुदायाला दिलेल्या आमच्या ‘लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट’ म्हणजेच ‘लाईफ’ या संदेशाचा आधार आहे. आपण असे प्रयत्न करूया ज्यामुळे भावी पिढ्यांसाठी धरती मातेची अनमोल संसाधने उपलब्ध राहू शकतील, असे त्यांनी संबोधित केले.