President Draupadi Murmu: “आरोग्यम् परमं सुखम्” — या भारतीय परंपरेचा दाखला देत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळा २०२६ चे उद्घाटन केले. यावेळी आयुष आरोग्यसेवेत उल्लेखनीय योगदान दिलेल्या सहा ज्येष्ठ वैद्यांना त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यात बोलताना राष्ट्रपतींनी आयुष चिकित्सा पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक वैद्यकशास्त्राचा प्रसार होण्यापूर्वीपासून योग, आयुर्वेद आणि सिद्ध यांसारख्या प्रणाली जनसेवा करत आल्या असून देशवासीयांच्या आरोग्यात त्यांचे योगदान अमूल्य असल्याचे त्यांनी सांगितले. शेत, स्वयंपाकघर आणि वनांमध्ये असलेल्या औषधी वनस्पतींच्या संपत्तीचे जतन व संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करताना राष्ट्रपतींनी सांगितले की, औषधी वनस्पतींची शेती केवळ शेतकऱ्यांचे आर्थिक उत्थान करत नाही, तर मृदा संरक्षणालाही हातभार लावते. त्यामुळे आयुष पद्धतींना प्रोत्साहन देणे म्हणजे एकाच वेळी शारीरिक, आर्थिक आणि पर्यावरणीय आरोग्य जपणे होय. हेही वाचा – बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांची एन्ट्री, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ आणि विजय-रश्मिकाचे लग्न; वाचा आजच्या टाॅप बातम्या जगभरात एकात्मिक चिकित्सेला मान्यता मिळत असून लोक तणावमुक्त जीवनासाठी योग आणि आयुर्वेदाकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन, औषधांचे मानकीकरण आणि गुणवत्ता नियंत्रण यांद्वारे आयुष पद्धतींची विश्वासार्हता आणखी वाढेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. आयुष मंत्रालय आंतरराष्ट्रीय मानकांनुसार संशोधन व औषध विकासासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आधुनिक विज्ञान, नवोन्मेष आणि वैश्विक सहकार्याच्या माध्यमातून पारंपरिक चिकित्सा पद्धती समग्र आरोग्यसेवेचा अविभाज्य भाग बनतील, असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी अखेरीस व्यक्त केला. संत गजानन महाराज संस्थान, शेगाव मंदिर परिसराची केली पाहणी – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्री गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील, हरिहर निळकंठ पाटील यांच्यासह आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संत श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी संत श्री गजानन महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदीर परिसराची माहिती घेत पाहणी केली. यानंतर त्यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळावा मुख्य कार्यक्रमस्थळी प्रस्थान झाले.