पोलिसांनीही काळजी घ्यावी; करोना रुग्णसंख्या वाढल्याने उपमुख्यमंत्र्यांनी केली सूचना

पुणे – पोलीस खात्यासमोर अचानक समस्या उभ्या राहतात. सध्याच्या करोनाच्या परिस्थितीत पोलीस विभागाची विशेष जबाबदारी आहे. करोना वाढतोय त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. सर्व घटकाना, नागरिकांना लसीकरण कसे करता येईल याचे नियोजन करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
माहेर महिला प्रतिष्ठानच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्त्याने पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माहेर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या म्हात्रे उपस्थित होत्या.
यावेळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, स्वप्ना गोरे, पोर्णिमा गायकवाड, भाग्यश्री नवटके, प्रियंका नारनवरे, मधुरा कोराणे यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पवार म्हणाले की, पोलीस दलात काम करताना अचानक उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना न डगमगता करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी असेच चांगले काम करुन पोलीस विभागाचे नाव उज्ज्वल करावे. महिला दिनाच्या औचित्त्याने हा सत्कार आपण करत आहोत. परंतु 12 मार्च या दिवसालाही महत्त्व आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या विचारावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय. त्याबाबतचा दृढ संकल्प केला आहे.
विद्यार्थ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये…
एमपीएससीच्या परीक्षा देऊन विद्यार्थी पोलीस, महसूल यासारख्या विविध विभागात काम करतील. काही दिवसातच परीक्षा घेतली जाईल, असे सांगितले होते, त्यानुसार परीक्षेच्या तारखाही आता जाहीर झाल्या आहेत. परीक्षेबाबत झालेल्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, अभ्यासावर लक्ष द्यावे, स्वत:ची काळजी घ्यावी, यश संपादन करावे, जे क्षेत्र निवडतील त्यात मनापासून उत्तम काम करावे, असा सल्लाही अजित पवार यांनी एमपीएससीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.





