“पिक्चर अभी बाकी है”, राहुल गांधींचा स्फोटक दावा; 40हून अधिक लोकसभा जागांवर मतचोरीचे पुरावे लवकरच….

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा गंभीर आरोपांचा भडिमार केला आहे. “फक्त एकाच जागेवर नव्हे, तर अनेक जागांवर मतचोरी झाली आहे. हे राष्ट्रीय पातळीवर पद्धतशीरपणे केले जात आहे. निवडणूक आयोगालाही याची माहिती आहे आणि आम्हालाही,” असे राहुल गांधी यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘पिक्चर अभी बाकी है’ असे म्हणत त्यांनी ४० हून अधिक लोकसभा जागांवर मतचोरीचे पुरावे लवकरच सादर करणार असल्याचे संकेत दिले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल-
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहेत. मंगळवारी (१२ ऑगस्ट) त्यांनी मतदार याद्यांमधील कथित अनियमिततांवरून आयोगावर टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडे ४० हून अधिक जागांवर मतचोरी झाल्याचे पुरावे असून, हे पुरावे लवकरच जाहीर केले जाणार आहेत. मंगळवारी सायंकाळी दिल्लीत झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत राहुल गांधी यांनी ही माहिती दिली. “आमच्याकडे आता पुरावे आहेत. ‘वन मॅन, वन वोट’ या तत्त्वाची अंमलबजावणी निवडणूक आयोगाने केलेली नाही. आम्ही संविधानाचे रक्षण करण्यासाठी लढत आहोत आणि ही लढाई सुरूच राहील,” असे त्यांनी ठणकावले.
महादेवपुरा प्रकरणाने खळबळ –
राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता. काँग्रेसच्या विशेष पथकाने या मतदारसंघातील मतदार याद्यांचे परीक्षण केले असता, भाजपा आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून मतांची फेरफार केल्याचे पुरावे सापडल्याचा दावा त्यांनी केला. “ही मतचोरी केवळ एका जागेवर मर्यादित नाही, तर देशभरात पद्धतशीरपणे अशी फेरफार होत आहे. यामुळेच एक्झिट पोल आणि पक्षांचे अंतर्गत सर्वेक्षण चुकीचे ठरतात,” असे राहुल यांनी सांगितले.
निवडणूक आयोग पुरावे नष्ट करत असल्याचा आरोप-
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. “मशीन-रीडेबल मतदार याद्या न देणे आणि कायदा बदलून सीसीटीव्ही फुटेज नाकारणे यामुळे निवडणूक आयोगाने भाजपाशी संगनमत करून निवडणुका चोरल्याचे स्पष्ट होते. देशभरातील मतचोरीचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आयोगाकडून होत आहे,” असे ते म्हणाले. बिहारमधील ‘१२४ वर्षांच्या’ मतदार मिंता देवी यांच्या प्रकरणावर बोलताना राहुल म्हणाले, “अशी असंख्य प्रकरणे आहेत. पिक्चर अभी बाकी है.”
इंडिया आघाडीचा मोर्चा, पोलिसांचा अडथळा –
सोमवारी (११ ऑगस्ट) इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या खासदारांनी बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाविरोधात आणि मतचोरीच्या आरोपांवरून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या वाटेतच अडवून ताब्यात घेतल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीने आयोगावर आणखी टीका केली.
राहुल गांधींचे प्रमुख आरोप –
मतचोरीचा पद्धतशीर डाव: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मतचोरीचा संशय बळावला. गेल्या पाच वर्षांत जोडल्या गेलेल्या मतदारांपेक्षा जास्त मतदार पाच महिन्यांत जोडले गेले.
वेळापत्रकातील गोंधळ: निवडणुकीचे अनेक टप्पे आणि वेळापत्रकातील बदल नियंत्रित निवडणुकीसाठी असल्याचा दावा.
बनावट मतदार: मतदार यादीत खोटे पत्ते, अवैध फोटो आणि बनावट मतदारांनी मतदान केल्याचा आरोप.
मताधिक्यात अचानक वाढ: मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर मताधिक्यात अचानक वाढ होणे.
महादेवपुरात अनियमितता: कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात एक लाख मतदारांची वाढ झाल्याचा दावा.





