Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल ते आजचा शपथविधी; आतापर्यंत राज्यात काय काय घडले?

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज शपथ घेणार आहेत. आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती असणार आहे. शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला बहुमत मिळल्यानंतर तब्बल दहा दिवस मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट होत नव्हते. अखेर काल देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून ते आजच्या शपथविधीपर्यंत राज्यात आतापर्यंत काय काय घडले त्यावर एक नजर टाकूया…
कोणत्या दिवशी काय घडले?
२३ नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला. महायुतीला बहुमत मिळाले.
२३ नोव्हेंबर : निकालानंतर अमित शाह यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली.
२३ नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी फोनवर चर्चा
२४ नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला
२४ नोव्हेंबर : शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड केली.
२६ नोव्हेंबर : विधानसभेचा कालावधी संपल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.
२८ नोव्हेंबर : दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची त्यांच्या घरी भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली.
२८ नोव्हेंबर : अमित शाह यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक पार पडली
२९ नोव्हेंबर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपालांची भेट घेऊन ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी होणार असल्याचे सांगितले.
३० नोव्हेंबर : एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावी रवाना, प्रकृती खराब असल्याचे कारण देत त्यांनी २ दिवस दरे गावीच मुक्काम केला.
२ डिसेंबर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची भाजपने महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.
३ डिसेंबर : भाजपचे दोन्ही निरीक्षक मुंबईत दाखल झाले. त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.
४ डिसेंबर : देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून दुपारी राज्यपालाकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला.





