Amit Deshmukh | Ajit Pawar – राज्याच्या तिजोरीची मालक ही जनताच आहे. संविधानाने आम्हाला दिलेला हक्क, आमच्यापासून कोणीही हिरावून घेवू शकत नाही, असा जोरदार पलटवार कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावर केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अहमदपूरमध्ये देशमुख बोलत होते. सामान्य माणसाला अभिप्रेत असलेला अहमदपूर शहराचा विकास साधायचा असेल तर लातूरप्रमाणेच या निवडणूकीतही आपण नगराध्यक्ष व सर्व उमेदवारांअन विजयी करुन पाठवावे असे आवाहन देखील अमित देशमुख यांनी केले. अहमदपूरमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व उद्धवसेनेने एकत्र महाविकास आघाडी स्थापन केली आहे. देशमुख यांनी यावेळी राज्यात सत्तेवर असणार्या महायुतीवर देखील टीका केली. ते म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या स्वार्थी राजकिय पक्षांची महायुती अहमदपूरमध्ये टिकलेली नाही. या निवडणूकीत आम्ही सर्वसामन्यांचा आवाज म्हणून माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्याकडे आमचे नेतृत्व सोपवले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. नीलम गोऱ्हेंकडून टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यांवरुन मित्रपक्षातील आमदार व विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील टोला लगावला. त्या म्हणाल्या की, ते म्हणाले असतील की किल्ली माझ्याकडे आहे, परंतू तिजोरीला एकच किल्ली नसते. तिजोरीची दुसरी किल्ली देखील असू शकते. फडणवीस मुख्यमंत्री होवूण १ वर्ष झाले आहे, त्यामुळे आम्ही सुरु केलेली आनंदाचा शिधा ही योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी मी करणार आहे. आर्थिक तरतुदीचे कारण सांगून ती योजना बंद करण्यात आली होती, असे त्या म्हणाल्या.