Rahul Gandhi : “पुंछच्या यातना तिथे जाऊनच समजतात” – राहुल गांधी

Rahul Gandhi – जम्मू-काश्मीरमधील पुंछ आणि इतर भागांना पाकिस्तानी माऱ्याचा दाह सहन करावा लागला. तेथील रहिवाशांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढे सरसावले. पुंछच्या यातना तिथे जाऊनच समजतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, संबंधित भागांसाठी तातडीने मदत आणि पुनर्वसन पॅकेज जाहीर केले जावे, असे साकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून घातले.
भारत आणि पाकिस्तानमध्ये नुकताच ४ दिवस संघर्ष झाला. त्यावेळी पाकिस्तानने सीमेपलिकडून भारतीय निवासी भागांवर मारा केला. त्यामुळे जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली. पाकिस्तानी माऱ्याचे लक्ष्य ठरलेल्या पुंछ भागाचा राहुल यांनी नुकताच दौरा केला. आता पुंछमधील स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मोदींना पत्र पाठवण्याबरोबरच सोशल मीडियावर एक पोस्टही टाकली.
मोठे नुकसान झालेली घरे आणि विस्कटलेले जीवन असे चित्र पुंछमध्ये पाहावयास मिळते. मात्र, त्या यातनांमधूनही आम्ही हिंदुस्थानी एक असल्याचा आवाज ऐकू येतो. केंद्र सरकारकडे मी कुठला आग्रह करत नाही. तर, सरकारला जबाबदारीची आठवण करून देतो. पाकिस्तानी माऱ्याने प्रभावित झालेल्या भागांसाठी ठोस आणि उदार स्वरूपाचे पॅकेज जाहीर केले जावे. तसे पॅकेज मदत नव्हे; तर कर्तव्य आहे, अशी भूमिका त्यांनी पोस्टमधून मांडली.
पाकिस्तानी माऱ्यात निवासी भागांमधील घरे, दुकाने, शाळा, धार्मिक स्थळांचे मोठे नुकसान झाले. एका फटक्यात आमची अनेक वर्षांची कठोर मेहनत उद्धवस्त झाल्याचे अनेक बाधितांनी मला सांगितले. अनेक दशकांपासून पुंछ आणि इतर सीमाभागांतील लोक शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात त्यांचे जीवन व्यतित करत होते.
मात्र, आता त्यांच्यावर पेचप्रसंग ओढवला आहे. त्यांच्या यातना जाणून घेऊन त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी शक्य ती मदत पुरवणे आपले कर्तव्य आहे, असे राहुल यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतीय हद्दीत मारा केला. त्यामध्ये पुंछ आणि इतर भागांत २८ जण मृत्युमुखी पडले, तर ७० जण जखमी झाले.





