Pune News : बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची माघार

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी चौकशी करण्यास नकार दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पणन संचालकांना दिले आहे. सुर्वे यांनी नकार दिल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला असून चौकशीसाठी दुसरा अधिकारी कधी नेमणार तसेच चौकशी कधी पूर्ण होणार असा प्रश्न बाजार घटकांमधून उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहनिबंधक दर्जाच्या त्रयस्त अधिकाºयामार्फत चौकशी करावी अशी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यामुळे, पुर्वी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केलेल्या प्रकाश जगताप यांची केलेली नियुक्ती रद्द करत त्या जागी सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता सुर्वे यांनीही नकार देत प्रशासनाला पत्र दिले आहे.
त्यामध्ये, विविध प्रकारचे ५१ चौकशीचे मुद्दे आहेत़ त्याची व्याप्ती पाहता तसेच लागणारा कालावधी पाहता तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी होणे शक्य नाही़ तसेच विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था पुणे विभागाची जबाबदारी मोठी आहे़ पुनरिक्षण अर्ज, त्यावरील सुनावण्या, क्षेत्रिय कार्यालयांचा आढावा, त्यांच्या सभा, तपासणी व इतर कामकाज यामुळे चौकशी प्रकरणात वेळ देणे शक्य नाही.
त्यामुळे चौकशी मुद्याची व्याप्ती व पदावर असलेला प्रशासकीय जबाबदारीचा विचार लक्षात घेवून माझ्या ऐवजी इतर सहनिबंधक दर्जाच्या अधिकाºयाची नियुक्ती करावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे, आता कोणाला चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करणार याबाबत पणन वर्तुळात चर्चा रंगली आहे़.
बाजार समितीच्या कारभाराबाबत चौकशी अधिकारी म्हणून सहनिबंधक योगीराज सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली होती़. मात्र, त्यांनी कामाच्या व्यापासह अन्य कारणे दिली आहेत़. त्यामुळे, याबाबत विचार करुन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे़
– विकास रसाळ,पणन संचालक





