“कार्यालय फोडले नाही, कुणी कोणाचे ‘एबी फॉर्म’ पळवले नाहीत, शिवीगाळ केली नाही…”; अमित ठाकरेंचा भाजपाला टोला

Aditya Thackeray | Amit Thackeray : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक ऐतिहासिक चित्र पाहायला मिळत आहे. ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केल्यानंतर आता प्रथमच शिवसेना भवन येथून आदित्या ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांना एकत्रित मार्गदर्शन केले आहे.
मुंबईसह सर्वच महापालिकांमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी कंबर कसली असून, त्यांच्या या संयुक्त संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
सत्ता आल्यास मुंबईकरांसाठी काय करणार?
निवडणुकीत सत्ता आल्यास मुंबईच्या विकासाचा नेमका ‘रोडमॅप’ काय असेल, याचे सादरीकरण दोन्ही नेत्यांनी यावेळी केले. यात प्रामुख्याने अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ | मुंबईतील उमेदवारांशी संवाद | शिवसेना भवन, दादर – #LIVE https://t.co/bXWXF0ZitP
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 2, 2026
मुंबईत मराठी माणसासाठी १ लाख परवडणारी घरे उपलब्ध करून देणार. सर्वसामान्यांसाठी जागतिक दर्जाचे ‘कॅन्सर हॉस्पिटल’ उभारणार. तसेच मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी बेस्ट बसचे भाडे अधिक परवडणारे करणार. असं यावेळी सांगण्यात आलं.
“आमच्याकडे निष्ठा, त्यांच्याकडे धनशक्ती” – आदित्य ठाकरे
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “मुंबईत आता शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे उत्तम समीकरण जुळले आहे. आपल्याकडे निष्ठा आणि जनशक्ती आहे, तर समोरच्यांकडे फक्त ‘धनशक्ती’ आहे.
विरोधक साम-दाम-दंड-भेदाचा वापर करत असून पैसे, भांडी-कुंडी वाटप सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह आहे, पण आम्ही केवळ जिंकण्यासाठी नाही, तर मुंबई वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत.”
अमित ठाकरेंचा भाजपला नाव न घेता टोला !
अमित ठाकरे यांनी आपल्या भाषणात अत्यंत संयमी पण धारदार शब्दात विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “आपल्या युतीत कोणी कोणाचे कार्यालय फोडले नाही, कुणी कोणाचे ‘एबी फॉर्म’ पळवले नाहीत की शिवीगाळ केली नाही. सर्वांनी सामंजस्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला, हीच खरी निष्ठा आहे. हाच फरक आमच्यात आणि त्यांच्यात आहे.”
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक आता अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने चर्चा सुरू असून, ही युती केवळ निवडणुकीपुरती नसून टिकवण्यासाठी आहे’, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.





