नाशिक – महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाशिकमध्ये राजकीय थरार पाहायला मिळाला. सिडको विभागीय कार्यालयाच्या परिसरात भाजपचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोर उमेदवार यांच्यात जोरदार हाणामारी झाली. भाजपचे बंडखोर उमेदवार देवानंद बिलारी आणि त्यांच्या पत्नीवर प्रतिस्पर्धी उमेदवाराने मागून अचानक हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नेमकं प्रकरण काय? आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने प्रशासकीय कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होती. भाजपमधील बंडखोरी शमवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच, सिडको विभागीय कार्यालयात देवानंद बिलारी हे आपल्या पत्नीसह आणि समर्थकांसह पोहोचले. अर्ज मागे घेण्यास अवघा एक तास शिल्लक असताना, शिरसाट नावाच्या भाजप उमेदवाराने बिलारी यांच्यावर मागून हल्ला केल्याचा खळबळजनक दावा बिलारी यांच्या पत्नीने केला आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, उमेदवारी मागे घेण्यावरून असलेला वाद यामागे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत दोन्ही गटांना पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.