Chhatrapati Sambhajinagar | ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा स्वस्तात मस्त ऑफर दिले जातात. खासकरून हिच ऑफर जर साड्यांच्या बाबतीत असेल, तर महिलांची एकच गर्दी जमते. असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला आहे. साड्या खरेदी करण्याचा नादात येथे वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. ५ हजाराची साडी ५९९ रुपयांत मिळणार या ऑफर्समुळे महिलांच्या झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. यात अनेक महिला बेशुद्ध देखील पडल्या. नेमकं काय घडलं ? मकरसंक्रांतीनिमित्त साड्यांवरील मोठ्या सवलतींच्या ऑफर्समुळे रविवारी संभाजीनगर शहरातील आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात थरार पाहायला मिळाला. 5 हजार रुपयांची साडी अवघ्या 599 रुपयांत मिळणार या बातमीने तब्बल 1000 हून अधिक महिला आणि मुलींनी एकाच वेळी दुकानावर गर्दी केली. या तुफान गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत 3 महिला श्वास गुदमरून बेशुद्ध पडल्या, तर अनेक लहान मुलांची आईपासून ताटातूट झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. त्रिमूर्ती रोडवरील या नवीन साडी सेंटरचे रविवारी उद्घाटन होते. त्यानंतर सकाळी 10 वाजेपासूनच महिलांच्या रांगा लागल्या होत्या. 11 वाजता उद्घाटन होऊन दुकान उघडताच महिलांनी आत शिरण्यासाठी एकच गर्दी केली आणि चेंगराचेंगरी झाली. काही वेळातच रस्ता पूर्णपणे जाम झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. Chhatrapati Sambhajinagar | प्रचंड वाहतूक कोंडी आणि गोंधळ दुकानात महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दुकान बंद केले. चार तास त्रिमूर्ती रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी आणि गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी माईकचा वापर केला. ‘ही ऑफर केवळ आजपुरती नसून वर्षभर आहे,’ असे जाहीर केल्यानंतर आणि बळाचा वापर करण्याचा इशारा दिल्यानंतर गर्दी निवळली अणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश मिळाले. Chhatrapati Sambhajinagar | हेही वाचा: ‘ओएमजी’च्या तिसऱ्या भागात पाहायला मिळणार मोठा बदल; लोकप्रिय अभिनेत्री दिसणार मुख्यभूमिकेत