Newasa News : अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथे चालत्या कार’ने घेतला पेट

नेवासा : अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खारा आणि गोडा पुलाजवळ शनिवारी (१८ ऑक्टोबर २०२५) सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास दादापाटील मोटे यांच्या वस्तीसमोर हुंदाई कंपनीच्या हेन्यु मॉडेलच्या पेट्रोल कारला आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
काय घडले नेमके?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार अहिल्यानगरवरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना चालकाला गाडीच्या बोनेटमधून धूर निघत असल्याचे लक्षात आले. चालकाने तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सावधगिरीने खाली उतरला. मात्र, त्याचवेळी गाडीने अचानक आगीचा भडका घेतला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आग इतक्या वेगाने पसरली की, गाडी पूर्णपणे जळून खाक झाली.
आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांनी आणि जवळच्या वस्त्यांवरील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने इतके भयंकर स्वरूप धारण केले होते की, त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. गाडीत केवळ चालक एकटाच होता आणि तो वेळीच गाडीतून उतरल्याने जीवित हानी टळली.
या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. जळणारी कार पाहून प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती. शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे हवालदार ज्ञानेश्वर माळवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहनचालकांना धीर देत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. त्यांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.





