Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगरमधील काहींचे दहशतवाद्यांशी लागेबांधे; मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप
छत्रपती संभाजीनगरमधील काही लोकांचे पाकिस्तानस्थित घटक आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी गुरुवारी केला.

Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगरमधील काही लोकांचे पाकिस्तानस्थित घटक आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी गुरुवारी केला. तसेच, कथित दहशतवादी आणि अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी जिल्ह्यात व्यापक शोधमोहीम राबवण्याची मागणी त्यांनी केली. शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत.
एका पत्रकार परिषदेत बोलताना शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची विनंती करणार आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये असे काही लोक आहेत ज्यांचे पाकिस्तान आणि काश्मीरशी दीर्घकाळापासून संबंध आहेत.
यापूर्वी, एल. के. अडवाणी (केंद्रीय गृहमंत्री असताना) यांच्या कार्यकाळात हा जिल्हा संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला होता. येथे एटीएसने काही दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला होता, या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे कारण, काही लोकांचे पाकिस्तानस्थित घटक आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांशी संबंध आहेत.
आपल्या जाळ्याद्वारे असे घटक केवळ दहशतवादी कारवायाच करत नाहीत, तर अमली पदार्थांचा व्यापारही करत आहेत. लोक अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत, ज्यामुळे शहरात हत्यांच्या घटना घडत आहेत. आम्ही या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेत आहोत आणि मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कारवाईची विनंती करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
शिरसाट यांनी पोलिसांना देखरेख वाढवण्याचे आणि संपूर्ण जिल्ह्यात शोधमोहीम राबवण्याचे आवाहन केले. येथील पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शोधमोहीम (Sanjay Shirsat) राबवली जावी आणि मला खात्री आहे की त्यातून काहीतरी ठोस माहिती हाती लागेल. नाशिकमधील निदा खान प्रकरणही काही लहान नाही आणि ते अशाच एखाद्या कारस्थानाचा भाग असू शकते, असेही ते म्हणाले.






