पिंपरी – नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा. हा सण दोन दिवसांवर आला असून, त्यानिमित्त बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली आहे. मकरसंक्रांती यंदा १५ जानेवारीला साजरी होत असून, त्यानिमित्त बाजारपेठे सुगड, पतंग, हलव्याचे दागिने तसेच काळ्या रंगाचे कपडे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे.
मकरसंक्रांतीच्या आधीचा दिवस हा भोगीचा सण म्हणून साजरा होत असतो. त्यादिवशी मिक्स भाजी, बाजरीच्या भाकरी बनविल्या जातात. त्यामुळे भाज्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. तसेच या दिवशी तिळगूळाचे वाटप करून गोड बोला असे सांगितले जाते. त्यामुळे बाजारपेठेत तिळ गुळाच्या वड्या, लाडू, चिक्की विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सुगड हे धनधान्याचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे सुगडमध्ये या मोसमातील सर्वच भाज्या, गाजर, बोर, हरभरा, ऊस, गव्हाच्या ओंब्या आदी भरून सुहासिनीची ओटी भरली जाते. त्यासाठी बाजारात हे सर्व साहित्य एकत्र करून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
सुगडला महत्त्व असल्याने शहरातील कुंभार वाड्यामध्ये महिनाभर आधीच त्याची तयारी सुरू होती. सध्या बाजारात हे सुगड विक्रीसाठी असून ५० रुपयांना पाच या प्रमाणे ते विकले जात आहेत. तसेच संक्रांतीला महत्व असते ते पतंगाला. बाजारपेठेत विविध प्रकारचे आणि आकारातील पतंग विक्रीसाठी आले असून, खरेदीसाठी बच्चे कंपनींची गर्दी होत आहे.