Nagar | पारनेर आगारामध्ये एसटीच संख्या अपुरीच

पारनेर, (प्रतिनिधी)- पारनेर आगारात आगार प्रमुखांसह सहाय्यक कार्यशाळा, अधीक्षक ही दोन सर्वात महत्वाची पदे गेली अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. आगारात असलेल्या अनेक बसेस जुन्या झाल्याने त्यांची दुरावस्था झालेली आहे.
इतकेच नव्हे तर गेल्या आठवड्यात डिझेलअभावी अनेक बससे उशीरा सोडाव्या लागल्या होत्या. काही बसेसच्या फेऱ्या रद्दही कराव्या लागल्या होत्या. एकंदर पारनेर बसस्थानकाकडे विभागीय अधिकाऱ्यांसह महामंडळाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
पारनेर आगारातील आगार प्रमुख योगेश लिंगायत यांची बदली होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.
तसेच कार्यालयातील महत्वाचे असलेले सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक हे पदही गेली सहा महिन्यापेक्षा अधिक काळ रिक्त आहे. या दोनही पदांचा कारभार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपाविण्यात आला आहे. त्यामुळे आगाराचे कामकाज विस्कळीत झाले आहे.
अनेक बसेसचे दरवाजे, खिडक्या तुटलेल्या आहेत. अनेकांच्या खिडक्या तसेच आरसे सुद्धा दोरीने बांधलेल्या आहेत. काही बसेसच्या खिडक्यांना काचाच शिल्लक राहिल्या नाहीत.अनेक बसेस पावसाळ्यात गळतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनेक बसमधील सिटांची् अवस्थाही वाईट आहे. अनेकदा बसेस रस्त्यावरच बंद पडत आहेत. कधी डिझेलअभावी तर कधी चालकांअभावी बसचे वेळापत्रक कोलमडले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.





