निगडी उड्डाणपूल 15 दिवसांत खुला करणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम 90 टक्के पूर्ण झाले असून, निगडी-देहूरोड हा पुणे-मुंबई जुना महामार्ग रस्ता वाहतुकीस 15 दिवसांत खुला केला जाणार आहे.
चौकातील वाहतूक सिग्नल फ्री होऊन अधिक सुरक्षित होण्यासाठी या चौकात उड्डाणपुल, ग्रेडसेपेरेटर व वर्तुळाकार मार्ग तयार केला जात आहे. या 90 कोटी 53 लाख खर्चाच्या कामास 27 जून 2017 ला वर्कऑर्डर देण्यात आली आहे.
कामाची मुदत अडीच वर्षे होती. मात्र, त्या परिसरातील अतिउच्च विद्युत वाहक तारा व टॉवर हटविण्यास विलंब झाल्याने या कामास 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता 31 ऑगस्ट 2020 पर्यंत काम पूर्ण करायचे आहे. लॉकडाऊनमुळे सुमारे तीन महिने काम बंद होत. तसेच, अनेक कामगार आपल्या गावी निघून गेल्याने उपलब्ध कामगारांकडून सध्या काम करून घेतले जात आहे.
निगडीहून देहूरोडकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. या पुलाचे अंतर 849 मीटर असून, दोन्ही बाजूने दुहेरी लेन आहे. काही भागात सुरक्षा कठडे तसेच, डांबरीकरण व रंगरंगोटीचे काम शिल्लक आहे. येत्या 15 दिवसांत ही कामे पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीस खुला केला जाणार आहे.
सद्यस्थितीत वाहनचालकांना त्रिवेणीनगर व अंकुश बोऱ्हाडे चौकातून वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर वाहनचालकांना वळसा मारावा लागणार नाही. पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. पुलाखालून ग्रेड सेपरेटरचे काम बाकी आहे. उड्डाणपूलाचे रंगकाम बाकी आहे. मात्र ते आता करण्यात येणार नाही. रंगकाम दिवाळीनंतरच केले जाईल.
– विजय भोजने, प्रवक्ता स्थापत्य विभाग





