Pune : कात्रज उड्डाणपुलाचे लोकार्पण पुढील वर्षीच ?

कात्रज – कात्रज उड्डाणपुलाचे काम २४ सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आल्यानंतर या कामासाठी मुदतवाढ घेण्यात आली त्यानंतर दुसऱ्यांदा घेण्यात आलेली मुदतवाढ ही २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत होती. सध्या तिसऱ्यांदा मुदवाढ घेण्यात आली असून डिसेंबर २०२५ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
परंतु, सध्या सुरू असलेल्या कामाची स्थिती पाहता हे काम पूर्ण होण्यास आणखी एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. या पुलाचे लोकार्पण २०२६ मध्ये होण्याची अधिक शक्यता आहे.
कात्रज उड्डापुलाचे काम भूसंपादना अभावी रखडले होत त्यास आता शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर जून २०२५ मध्ये भूसंपादन पूर्ण करून त्यानंतर सहा महिन्यांत पुलाचे काम पूर्ण होइल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले होते. मात्र, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
सध्या सुरू असलेले काम, भूसंपादनास लागणारा कालावधी, भूमिअभिलेख विभागाचे आंदोलन यापार्श्वभूमीवर यावर्षात उड्डाणपुलाचे काम पूर्ण शक्य नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदर काम वेगाने पूर्ण करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
उड्डाणपुलाची सद्यःस्थिती
– कार्यारंभ आदेश : २५ फेब्रुवारी २०२२
– मुदतवाढीसह काम पूर्ण होण्याची तारीख : डिसेंबर २०२५
– एकूण १९ गाळ्यांपैकी १० दहा गाळ्यांचे काम पूर्ण
– कात्रज चौकातील अवघड टप्पा पूर्ण
‘जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जागेचे भूसंपादन होत आहे. त्यानुसार कामाला गती मिळेल. जूनअखेरपर्यंत जागा ताब्यात आली तरी आम्ही डिसेंबर २०२५ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत.’ – श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण





