Pune : उड्डाण पुलाच्या ठेकेदाराचा अनागोंदी कारभार

पुणे – सिंहगड रस्त्यावर उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या अनागोंदी कारभारामुळे मंगळवारी सकाळी माणिकबाग ते विठ्ठलवाडीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागला.
आधीच या रस्त्यावर संतोष हाॅलकडून राजाराम पुलाकडे जाताना हिंगणे चौकात उड्डाण पुलाच्या रॅम्पचे काम सुरू असल्याने वाहनांना केवळ एक ते दीड लेनचा रस्ता आहे. त्यातच ठेकेदाराने संतोष हाॅलपासून हिंगणेच्या दिशेने पदपथ करण्यासाठी शिल्लक असलेला रस्ताही उकरून ठेवल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
येत्या रविवारी याच रस्त्यावर प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हे काम अर्धवटच झाल्यास होणाऱ्या गोंधळाला जबाबदार कोण, असाही उपस्थित केला जात आहे.
३०० मीटरचा बाॅटल नेक
सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून राजाराम पूल ते फनटाइमपर्यंत उड्डाण पूल उभारला जात आहे. त्यातील धायरीकडे जाणारा मार्ग सुरू झाला आहे, तर राजाराम पुलाकडे येणाऱ्या रॅम्पचे काम हिंगणे चौकात सुरू आहे. त्यामुळे तेथे अवघा दीड लेनचा रस्ता उरला आहे.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या पदपथावर महावितरणचा डेपो, एक खासगी नर्सरी, तसेच काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने चालणारे नागरिकही मुख्य रस्त्यावर येतात. त्यामुळे संतोष हाॅल ते विठ्ठलवाडी चौक हे ३०० मीटरचे अंतर ओलांडण्यासाठी वाहनचालकांना सुमारे २० ते २५ मिनिटे जातात.
आधीच हा रस्ता बाॅटल नेक असताना आता ठेकेदाराने संतोष हाॅलसमोरून ते हिंगणे चौकाकडे जाणारा रस्ता पदपथ करण्यासाठी खोदला आहे. पाऊस सुरू असल्याने या ठिकाणी केलेल्या खोदाईमुळे रस्त्यावर चिखल आला असून, खोदाईसाठीचा जेसीबी, तसेच डंपर रस्त्यावरच उभे आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने हे अंतर पार करण्यासाठी अनेकांचा अर्धा तास गेला.
नेमकी गडबड कशासाठी?
ठेकेदाराने जूनअखेरीस रॅम्पचे काम पूर्ण करणे अपेक्षित असताना काम दोन महिन्यांपासून रडतखडत सुरू आहे. आता पावसामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यावर अनधिकृत पार्किंगही होत आहे. परिणामी हिंगणे चौक कोंडीत अडकला आहे. असे असतानाच या कोंडीवर मार्ग काढण्याऐवजी आधीच छोटा असलेला रस्ता खोदण्याची गडबड कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. खोदाई केल्यानंतर कोंडी होणार हे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष कशासाठी, याचेही उत्तर प्रशासनाकडे नाही.





