पुढच्यास ठेच, मागचा शहाणा; क्षेत्रीय कार्यालयांकडून अनधिकृत होर्डिंग काढण्यास सुरूवात

पुणे – क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अनधिकृत होर्डिंगची भरमार असताना आयुक्तांना खोटा अहवाल सादर केल्याने नगररस्ता-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला (परवाना निरीक्षक) निलंबित करण्यात आले.
या कारवाईचा धसका इतर क्षेत्रीय कार्यालयांनी घेतला असून, गेल्या दोन दिवसांत येरवडा परिसरातील तीन आणि वानवडी भागातील तीन अनधिकृत होर्डिंग क्षेत्रीय कार्यालयांनी काढून घेतली आहेत. तर, इतर क्षेत्रीय कार्यालयांकडूनही कारवाईसाठी मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे.
यावर्षी पावसाळ्यात तीन ठिकाणी होर्डिंग पडली आहेत. शहरात महापालिकेने मान्यता दिलेले २६४० अधिकृत होर्डिंग आहेत. यावर्षी शहरात पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातल्याने पालिकेने पावसाळ्यातील खरबदारीच्या अनुषंगाने तातडीने अनधिकृत होर्डिंग काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले होते. त्यानंतर १४ क्षेत्रीय कार्यालयांनी दिलेल्या अहवालात शहरात केवळ २४ अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) असल्याचे नमूद करण्यात आले होते.
मात्र, या अहवालावर थेट आयुक्तांनीच प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, अनधिकृत होर्डिंगला अधिकारीच आर्थिक देवणा-घेवाणीतून पाठबळ देत असल्याने आयुक्तांकडून अशा अनधिकृत होर्डिंगची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या तपासणीत आतापर्यंत ९१ अनधिकृत होर्डिंग शहराच्या वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सापडली असून आपल्यावरही निलंबनाची कारवाई होण्याच्या भीतीने या होर्डिंगला नोटिसा देण्यासह ते काढून घेण्याचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयांकडून आकाशचिन्ह आणि परवाना विभागास देण्यात आले आहे.
‘आयुक्तांच्या सूचनेनुसार चुकीच्या माहिती देणाऱ्या परवाना निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, इतर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही होर्डिंग आढळून येत असून, त्यांच्याकडून ते काढून घेतले जात आहेत.’ – संतोष वारूळे, उपायुक्त, आकाशचिन्ह आणि परवाना विभाग





