Pune District : तुकोबारायांच्या पादुकांचे ‘नीरा स्नान’
Pune District : संतांचे चरण म्हणजे भक्तासाठी मोक्षाचा मार्ग मानला जातो. नीरेच्या निर्मळ प्रवाहात तुकोबारायांच्या पादुकांना घातलेले हे स्नान म्हणजे भक्ती, समर्पण आणि संत परंपरेप्रती असलेल्या अखंड श्रद्धेचे प्रतीक आहे.

इंदापूर : आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदचि अंग आनंदे ॥
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील आनंद म्हणजे केवळ वैयक्तिक सुख नव्हे, तर परमेश्वराच्या चरणाशी एकरूप झालेल्या भक्तीचा अखंड महासागर होय. भक्त जेव्हा विठ्ठलनामात तल्लीन होतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक अश्रूत आणि प्रत्येक पावलात आनंदच संचारतो.
सराटी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीच्या पवित्र पात्रात सोमवारी सकाळी पार पडलेल्या तुकोबारायांच्या पादुकांच्या स्नान सोहळ्यात हाच आनंद प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. “ज्ञानोबा-तुकोबा”, “ग्यानबा माऊली तुकाराम” आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड गजराने नीरा नदीचा काठ भक्तिरसाने दुमदुमून गेला. हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या आसेने, तुकोबारायांच्या चरणसेवेचा लाभ घेण्यासाठी आणि पादुकांच्या मंगल स्नानाचे साक्षीदार होण्यासाठी नीरा तीरावर लोटले होते.
सराटी येथे नीरा नदीच्या काठी उभारण्यात आलेल्या जर्मन हँगरमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम होता. पहाटेपासूनच वारकरी, दिंड्या, टाळ-मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या अखंड गजराने परिसर भक्तिमय झाला होता.
नदीच्या पात्रात पारंपरिक विधीनुसार संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना प्रथम दही, दूध, पवित्र जल, हळद, चंदन व अष्टगंधाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सुगंधी बुक्का, चंदनाची उटी आणि विविधरंगी फुले अर्पण करून पादुकांची महाआरती करण्यात आली. हजारो वारकरी डोळ्यांत भक्तीचे अश्रू घेऊन या अलौकिक सोहळ्याचे दर्शन घेत होते.
वारकरी संप्रदायात पादुकांच्या स्नानाला अत्यंत पवित्र स्थान आहे. संतांचे चरण म्हणजे भक्तासाठी मोक्षाचा मार्ग मानला जातो. नीरेच्या निर्मळ प्रवाहात तुकोबारायांच्या पादुकांना घातलेले हे स्नान म्हणजे भक्ती, समर्पण आणि संत परंपरेप्रती असलेल्या अखंड श्रद्धेचे प्रतीक आहे.
पादुकांवर दूध-दहीचा अभिषेक होत असताना हजारो वारकरी हरिनामात तल्लीन झाले होते. टाळ-मृदुंगाचा निनाद, विणेचे सूर आणि विठ्ठलनामाच्या घोषाने संपूर्ण परिसर जणू वैकुंठभूमीत परिवर्तित झाला होता. प्रत्येक वारकऱ्याच्या मुखी विठ्ठलनाम आणि हृदयात पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ स्पष्ट जाणवत होती.
या मंगल सोहळ्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने पालखी खांद्यावर घेत रथात विराजमान केली. “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात पालखीने पुढील प्रवासास सुरुवात केली.
नीरा नदी ओलांडताच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात भक्तिमय प्रवेश झाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील हजारो भाविक उपस्थित होते.
पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, बारामतीचे उपविभागीय अधिकारी संजय तेली, देहू संस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, विविध विभागांचे शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नीरा नदीच्या सीमेवर पुणे जिल्हा पोलिसांनी पालखीच्या सुरक्षेची जबाबदारी सोलापूर जिल्हा पोलिसांकडे सुपूर्द केली. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच पालकमंत्री जयकुमार गोरे व मान्यवरांनी पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले.





