‘सर्वात सुंदर गोष्टी तेव्हाच घडतात, जेव्हा…’; लोकप्रिय अभिनेत्रीचे ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक

Shweta Pendse | ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘वचन दिले तू मला’ असे या मालिकेचे नाव असून यात अभिनेत्री श्वेता पेंडसे ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. याबद्दलची एक खास पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे.
या मालिकेत श्वेता पूर्वा शिंदे ही भूमिका साकारणार आहे. याच भूमिकेतील एक फोटो शेअर करत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टमध्ये श्वेता म्हणते, “पोटात गोळा… छातीत धडधड… आणि तरीही प्रचंड आनंद आणि विलक्षण उत्साह जाणवतोय. ७ वर्षांनी पुन्हा एकदा मालिकेत अभिनय करतेय. म्हणतात ना… ‘सर्वात सुंदर गोष्टी तेव्हाच घडतात, जेव्हा आपण त्यांची अपेक्षाच करत नसतो’, अगदी तसंच झालं. बऱ्याच दिवसांपासून एका वेगळ्या आणि चांगल्या भूमिकेच्या शोधात होते आणि अक्षरशः मनीध्यानी एका दिवसात हे सगळं जुळून आलं. पहिल्या दिवशी सेटवर गेले; तेव्हा माझाच विश्वास बसत नव्हता की मी पुन्हा एकदा शूट करतेय.”
पुन्हा एकदा स्टार प्रवाहबरोबर नवीन प्रवास
“माझा अभिनेत्री म्हणून मालिका विश्वातला प्रवास स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘ लक्ष्य ‘ मालिकेपासून सुरू झाला. त्यानंतर याच वाहिनीवर ‘जयोस्तुते’ ही मालिका केली. नंतर ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका खूप गाजली. यातल्या ‘विभावरी इनामदार’ या भूमिकेने मला मालिकाविश्वात खऱ्या अर्थाने अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. आता पुन्हा एकदा स्टार प्रवाहबरोबर नवीन प्रवास सुरू होतो. ‘वचन दिले तू मला’ या मालिकेत ‘पूर्वा शिंदे’ ही भूमिका करायची संधी मिळाली आहे. ही अत्यंत गोड व्यक्तिरेखा आहे. मला ऐकताक्षणी ही भूमिका फार भावली. कारण या व्यक्तिरेखेला खूप कंगोरे आहेत. माझ्यासाठी ही भूमिका साकारणं खरंतर एक आव्हान आहे. ते का? हे मालिका बघितल्यावर तुम्हाला कळेलच.” Shweta Pendse |
View this post on Instagram
पुढे श्वेता म्हणते, “रंगभूमीवर ’38 कृष्ण व्हीला’ नाटकातील ‘नंदिनी’, ‘शशsss घाबरायचं नाही’मधली ‘निरांजनी’ आणि ‘खानावळवाली’, ‘अ परफेक्ट मर्डर’मधील इन्स्पेक्टर घारगे आणि आता ‘वचन दिले तू मला’ मालिकेमध्ये ‘पूर्वा शिंदे’ या अत्यंत भिन्न चार व्यक्तिरेखा एकाच वेळेस मला साकारायला मिळत आहेत. ही एक अभिनेत्री म्हणून किती सुखावणारी गोष्ट आहे.”
‘भीती वाटतेय, पण जीव ओतून काम करेन’
“मी आता मालिकेत कामच करणार नाहीये, असं सगळ्यांना वाटत असताना या सुंदर व्यक्तिरेखेची जबाबदारी माझ्यावर विश्वासाने आणि हक्काने दिल्याबद्दल मी सेवंथ सेन्स मीडिया आणि संपूर्ण स्टार प्रवाह टीमचे मनापासून आभार मानते. खरंतर खूप भीती वाटतेय, पण मी जीव ओतून काम करेन. तुम्हालाही पूर्व शिंदे, या मालिकेतल्या इतर सगळ्याच व्यक्तिरेखा आणि ही मालिकासुद्धा खूप आवडेल याची आशा नव्हे तर खात्री आहे. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असू द्या,” असे श्वेताने पोस्टमध्ये म्हंटले आहे. Shweta Pendse |
हेही वाचा:
मेस्सी मैदानात आला अन् ‘या’ कारणामुळे चाहते संतापले; थेट बाटल्या अन् खुर्च्या फेकत घातला गोंधळ





