“आमदारकी गेली खड्ड्यात, मुंबई, ठाण्यासह पुणेही जाम करू”; विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट इशारा

नागपूर : मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आज ओबीसी समाजाने 371 जातींच्या प्रतिनिधींसह विशाल मोर्चा काढला. महायुती सरकारच्या 2 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयाविरोधात (GR) हा मोर्चा काढण्यात आला. या निर्णयाला तात्काळ रद्द करण्याची मागणी मोर्चेकरांनी केली. काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका करत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला.
वडेट्टीवार म्हणाले, “या ऐतिहासिक मोर्चात 371 ओबीसी जाती आहेत, तर दुसरीकडे मराठा एकच जात आहे. 56 टक्के लोकसंख्येला 27 टक्के आरक्षण आणि 15 टक्के लोकांना 48 टक्के आरक्षण देणे ही सरकारची चाणक्यनिती आहे. 2 सप्टेंबरचा जीआर वाचून असं वाटतं, तुम्ही एकट्या जरांगेच्या भरवशावर सत्तेत आलात का?” त्यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा साधला, “मराठ्यांना EWS मधून 8.5 टक्के आरक्षण मिळतंय, पण जरांगेला हे समजत नाही.”
वडेट्टीवारांनी सरकारला थेट इशारा दिला, “2 सप्टेंबरचा जीआर रद्द न केल्यास मुंबई, पुणे आणि ठाणे जाम करू. माझा डीएनए ओबीसी आहे. ओबीसींच्या गळ्यावर सुरी फिरवणाऱ्यांना सुधरा, नाहीतर जागा दाखवू.” त्यांनी आरोप केला की, सरकारने 2.4 लाख मराठा प्रमाणपत्रे वाटली, ज्यामुळे “संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला आहे.” पुढे नातेवाईकांनाही प्रमाणपत्रे दिल्यास ओबीसी कोट्यात घुसखोरी वाढेल, असा दावा त्यांनी केला. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या हातात घंटा द्यावी, मग आम्ही घंटा वाजवू,” असा टोला त्यांनी लगावला.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास विरोध नसल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले, “पण ओबीसी कोट्यात घुसखोरी आम्ही खपवणार नाही. हा मोर्चा फक्त झाकी आहे. सरकारने घुसखोरी थांबवली नाही, तर आम्ही सरकारला थांबवू.” त्यांनी सरकारवर धनगर आणि ओबीसी समाजात फूट पाडण्याचा आणि आरक्षणविरोधी विचारधारा बाळगण्याचा आरोपही केला.





