Manoj Jarange : “मराठा-ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव”; मनोज जरांगेचा स्फोटक दावा

वडीगोद्री (जालना) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी छगन भुजबळ आणि मराठा गोलमेज परिषदेवर जोरदार हल्लाबोल केला. “मला एकटे पाडण्यासाठी आणि मराठा-ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय,” असा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला.
भुजबळांनी हैदराबाद गॅझेट निर्णयाविरोधात रिट याचिका दाखल करण्याच्या आवाहनावर जरांगे यांनी तीव्र टीका केली. “तो येवल्याचा नासका माणूस आहे, त्याला कोणाचे कल्याण नको. हा मराठा आणि ओबीसींमध्ये दंगल घडवायला निघाला आहे,” असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला.
अंतरावली सराटीतील लाठीचार्जच्या आरोपांवरही त्यांनी भुजबळांना खडेबोल सुनावले. “तो जनताविरोधी, मराठाविरोधी आणि ओबीसीविरोधी आहे. सरकारने चौकशी केली, त्याला काय माहिती? त्याचे जेलमध्ये जाण्याचे दिवस जवळ आले आहेत,” असंही जरांगे यांनी म्हटले आहे.
“गरीब मराठा-ओबीसींनी संयम राखावा”
जरांगे यांनी गरीब मराठा आणि ओबीसी समाजाला संयम राखण्याचे आवाहन केले. “आम्ही कोणत्याही जातीविरोधात बोलत नाही, पण अशा लोकांचा जन्मच नको. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शाप दिला असणार,” असे ते म्हणाले.
धनगर नेत्यांनाही खडसावले
धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनावर नाव न घेता लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, “स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या नेत्यांनी बुद्धीचा वापर करावा. एसटी आरक्षणासाठी मेहनत घेतली असती, तर धनगर समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतले असते.”
गोलमेज परिषदेवर मौन
मराठा गोलमेज परिषदेवर बोलताना जरांगे यांनी चर्चा टाळली. “त्यांच्यावर बोलायचं नाही. आपलं गरिबांचं काम सुरू आहे,” असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.




