Manoj Jarange : शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं; आमचं आरक्षण हिसकावून ओबीसींना दिलं, मनोज जरांगेंचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच थेट शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. 1994 मध्ये शरद पवारांनी मराठ्यांचं 16 टक्के आरक्षण हिसकावून ओबीसींना दिल्याने मराठा समाजाचं वाटोळं झाल्याचा घणाघाती आरोप जरांगे यांनी केला. याचवेळी, ओबीसी नेत्यांनीही पवारांचे उपकार मानले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
मराठ्यांचं हक्काचं आरक्षण हिसकावलं
मनोज जरांगे म्हणाले, “1994 मध्ये मराठ्यांचं हक्काचं 16 टक्के आरक्षण शरद पवारांनी ओबीसींना दिलं. यामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं. पण ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं, त्या पवारांचे उपकारही ओबीसी नेत्यांनी मानले नाहीत.” यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. मात्र, आता जरांगे यांनी थेट पवारांवर निशाणा साधत मराठा समाजाच्या नुकसानाचं खापर त्यांच्यावर फोडलं आहे.
छगन भुजबळांवरही आरोपांचा भडिमार
दरम्यान, जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही गंभीर आरोप केले. भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यात गुप्त बैठक झाली असून, त्यात ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसकडे सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला गेल्याचा दावा जरांगे यांनी केला. “अजित पवारांनी मला इथं गुंतवून ठेवलंय, त्यामुळे ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसने घ्यावं, असं भुजबळांनी वडेट्टीवारांना सांगितलं,” असा खळबळजनक दावा जरांगे यांनी केला.
जरांगे मराठ्यांचे नेते नाहीत, भुजबळांचं प्रत्युत्तर
जरांगेंच्या या आरोपांना भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “मनोज जरांगे हे मराठा समाजाचे नेते नाहीत. मराठा समाजाने त्यांना उगाच डोक्यावर चढवलंय,” असं भुजबळ म्हणाले. तसेच, जरांगेंच्या दाव्याप्रमाणे कोणतीही गुप्त बैठक झाली नसल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.





