chhagan bhujbal : “जरांगेंमुळे मराठा समाजालाच त्रास झाला”; मंत्री होताच भुजबळांचा हल्लाबोल

मुंबई – मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात यापूर्वी सातत्याने वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच आज छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि मनोज जरांगे यांनी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्याला, भुजबळांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.
जरांगेंनीच एवढ्या मोठ्या चुका अन् खेळ्या केल्या आहेत. त्यांनीच सगळ्यात जास्त मराठा समाजाचे नुकसान केले आहे, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला. खरंतर मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो, पण ह्या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच निश्चितपणे मराठा समाजालाच त्रास झाला. त्याच्यामुळेच गावागावात वाद लागले आहेत, असेही भुजबळ म्हणाले.
देतील ती जबाबदारी पार पाडू
दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की, शेवट चांगला असेल तर सगळे चांगले अशी इंग्रजीत एक म्हण आहे. 1991 पासून मी विविध खाती सांभाळली आहेत. विविध विभागांचा कारभार मी पाहिलेला आहे. गृहमंत्रिपदापासून विविध जबाबदाऱ्या मी सांभाळल्या आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे खातं देतील त्या खात्याचा मंत्री म्हणून काम करणार आहे. मी असे कोणते खातं मागितले नाही. मी सर्व खाते सांभाळले आहे, आता ज्या खात्याची जबाबदारी दिली जाईल ती स्वीकारू, असेही ते म्हणाले.





