पुणे जिल्हा | लोकसभेपासून विश्वास शब्दावरील विश्वास उडाला

काटेवाडी, (वार्ताहर)– वीस-बावीस वर्षे झाली काटेवाडी गावाच्या विकासासाठी मनापासून झोकून दिले. गावाबद्दल आत्मसन्मान, प्रेम होते म्हणून प्रपंचाकडे दुर्लक्ष करून देखील काटेवाडी गावाचा विकास केला.
काटेवाडी गावाचे नाव राज्यातच नव्हे; तर देशात झाले. आत्तापर्यंत 200 कोटी रुपयांची विकासकामे काटेवाडीमध्ये झाली आहेत; परंतु लोकसभेच्या निवडणुकीपासून विश्वास ह्या शब्दावरच विश्वास राहिला नाही, अशी खंत राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
काटेवाडी (ता. बारामती) येथे काटेवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने खासदार सुनेत्रा पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी गावात प्रवेश करताच कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत खासदार सुनेत्रा पवार यांचे वाद्याच्या गजरामध्ये स्वागत केले.
यावेळी सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, राजेंद्र पवार, विद्याधर काटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष हरिश्चंद्र मासाळ, अनिल काटे, हभप सुनील काटे, के. टी. जाधव, राहुल घुले, दत्तात्रय काटे, प्रकाश काटे, दत्तात्रय देवकाते, जितेंद्र काटे, सतीश देशमुख, ग्रामविकास अधिकारी लवटे तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान बारामती तालुक्यातील सर्वच गावांना भेटी देण्याचा योग आला त्यावेळी इतर गावांची निधी मिळवण्याबद्दलची धडपड लक्षात येते त्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे उंबरे झिजवावे लागतात.
त्या प्रमाणात आपल्या काटेवाडी गावाला सगळं काही निधी मंजूर होऊन येतो व त्या निधीमध्ये गावातील विकास कामे केले जातात. कोट्यावधी रुपयांची कामे गावात केली जातात परंतु या कोट्यावधी रुपयांचा विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कशा पद्धतीने निधी उपलब्ध करतात याचा थोडा तरी विचार जनतेने केला पाहिजे, जनतेला सर्वकाही आपोआप मिळत असल्यामुळेच जनतेला याची किंमत राहिलेली नाही.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शनिवारी किंवा रविवारी जनता दरबार बारामती मध्ये घेतात, काही लोक आम्हाला दादा भेटत नाहीत असे म्हणतात जर जनता दरबार घेत असतील तर तुम्ही असे कसे म्हणू शकता की, दादा भेटत नाहीत.
जनतेला सवय झाली आहे की सगळं काही आपल्या घरापर्यंत आपोआप पोहोच झालं पाहिजे. आपल्या स्वतःच्या कामासाठी तरी बारामती पर्यंत गेले पाहिजे ना. काटेवाडी मध्ये येऊन विरोधकांनी तुम्हाला प्रलोभन दाखवली परंतु दादांशिवाय काटेवाडी च्या विकासामध्ये कोणाचा हात आहे, त्यांनी आज पर्यंत तुमच्यासाठी काय केले याचाही विचार जनतेने करावा.
बारामती व तालुक्यातील विकासासाठी खर्या अर्थाने अजितदादांची गरज आहे. येणार्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दादांनी बारामतीतूनच लढावे, असा आग्रह आम्ही करणार आहोत असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. अजितदादा पवार हे विक्रमी मताधिक्याने निवडून देऊ अशी ग्वाही दिली.





