Ajit Pawar ashes: लोकनेते अजितदादा पवार यांच्या अस्थींचे प्रवरासंगम येथे विसर्जन
Ajit Pawar ashes: बारामतीहून आलेल्या या अस्थींचे अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण पूजन करण्यात आले.

Ajit Pawar ashes: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थींचे सोमवारी सायंकाळी प्रवरासंगम येथील गोदावरीच्या पवित्र तीरावर विसर्जन करण्यात आले. बारामतीहून आलेल्या या अस्थींचे अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण पूजन करण्यात आले. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विधी पार पडला. यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास स्व. दादांच्या अस्थी प्रवरासंगम येथे आणण्यात आल्या. घनश्याम रसाळ आणि ऋषिकेश जोशी या पुरोहितांनी वेदमंत्रांच्या जयघोषात अस्थींचे पूजन केले. त्यानंतर अत्यंत जड अंतःकरणाने गोदावरीच्या पात्रात अस्थी विसर्जित करण्यात आल्या. या प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, सत्यजित कदम, अब्दुल शेख, संजय कोळगे, ताहेर पटेल, अशोक सावंत, संभाकाका पवार, दादा गंडाळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना चंद्रशेखर घुले पाटील म्हणाले की, अजितदादांच्या निधनाने राज्याच्या सहकार चळवळीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. शब्दाला पक्का असणारा आणि प्रशासनावर मजबूत पकड असणारा असा हा धडाडीचा नेता होता. त्यांनी दिलेला ‘वादा’ संपूर्ण राज्याला ठाऊक होता. अशा लोकनेत्याला एवढ्या लवकर श्रद्धांजली वाहण्याची वेळ येणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्हा सहकारी बँक, ज्ञानेश्वर उद्योग समूह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांनी दादांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, राजेंद्र नागवडे आणि अब्दुल शेख यांनीही आपल्या शोकसंवेदनेत दादांच्या अकाली जाण्याने पोरकेपणाची भावना निर्माण झाल्याचे सांगितले. या प्रसंगी अशोक मिसाळ, बाळासाहेब नवले, शिवाजी कोलते, भाऊसाहेब कांगुणे, भाऊसाहेब सावंत, गणेश गव्हाणे, जगन्नाथ कोरडे, विलास देशमुख, तलाठी ऐश्वर्या देशमुख, बी. के. चव्हाण, योगेश रासने, जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे, नगरसेवक प्रवीण सरोदे, बाबा कांगुणे, तालुकाध्यक्ष अशोक मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, अजित दादांच्या अस्थींचे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जन करण्यात आले आहे.





