शैक्षणिक दूरदृष्टीचे नेतृत्व: अजितदादा पवार

Ajitdada Pawar – २२जुलै, हा आदरणीय अजितदादांचा जन्मदिवस. राजकीय वारसा असल्यामुळे राजकारणात प्रवेश झाला खरा मात्र वारसा असल्याच्या कोषातून बाहेर पडून एक मुत्सद्दी, धाडसी, आक्रमक, दूरदृष्टीचा नेता अशी स्वतःची स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्यात दादांना यश आले आहे. संपूर्ण राज्यात आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि डोळस नेतृत्वाने अजितदादांनी वेगळी छाप निर्माण केली आहे. स्पष्टवक्तेपणा, अभ्यासूवृत्ती, काम करण्याची मोठी क्षमता यामुळेच दादांचे मोठेपण उठून दिसते. चुकीच्या गोष्टीला कधीही पाठीशी घालायचं नाही, अडचणीत असलेल्यांना लगेच मदत करायची अशा व्यक्तिमत्त्वाचे हे नेतृत्व उद्याचा नवा महाराष्ट्र घडविणारे आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला करारीपणा आणि जिद्दीची झळाळी असली तरी त्यासोबत सहृदयतेचीही लोभस झालर आहे, हे त्यांना जवळून ओळखणाऱ्यांना अनुभवास आल्याशिवाय रहात नाही.
अतिशय धीरगंभीर व सतत समाजकार्यात व्यग्र असणारा हा नेता कधी थकलेला कोणी पाहिलाच नाही. भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जातीने विचारपूस करून तातडीने काम होण्यासाठी वेळप्रसंगी आपला करारीबाणा वापरणारे अजितदादा अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या वागण्यातले पैलू जवळून पाहिले म्हणजे त्यांच्यातले नेतृत्वगुण अनुभवायला मिळतात. गोरगरीब जनतेची सेवा व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याला प्राधान्य देऊन अहोरात्र परिश्रम करीत असलेले अजितदादा पुणे जिल्ह्यातील आमच्या भागातील आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो.
समाजातील काही व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या असतात. त्या राजकीय क्षेत्रात कार्यमग्न आहेत म्हणून नाही, तर त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलेले असते. त्यामुळेच कठोर परिश्रमाला पर्याय नाही ही उक्ती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लागू पडते. त्यांनी राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडून राजकारण आणि समाजकारणाचे योग्य मार्गदर्शन घेऊन संपूर्ण राज्यात आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि डोळस नेतृत्त्वाने वेगळी छाप निर्माण केली असली तरी त्यांच्या स्वकर्तुगाकडे दुर्लक्ष करता येत नाही.
साहित्य संमेलने, क्रीडा स्पर्धा, पुरस्कार समारंभ, व्याख्यानमालांमधील त्यांची उपस्थिती, विविध शासकीय कार्यक्रम, राजकीय व्यासपीठ, चर्चासत्रे, उद्घाटन, भूमिपूजन कार्यक्रमांमधील त्यांची भाषाशैली, वक्तृत्व, अभ्यासू, नेटके शब्द ही त्यांच्या परिपक्वतेची वैशिष्ट्ये उपस्थितांना जाणवतात. सतत सकारात्मक विचार करून निर्णय घेणे, त्यांची कठोरपणे अंमलबजावणी करणे आणि यात कुचराई करणारे सरकारी अधिकारी असोत, संस्थाप्रमुख, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, मंत्री असोत, ते कोणाची गय करीत नाहीत हे सर्वश्रुत आहे. शासनाचे विविध खात्यांचे निर्णय, संस्थांचे निर्णय, त्या विकासकामांचा आराखडा पुढील दोन पिढ्यांचा विचार करून घेणे, निधीचा वापर दर्जेदार कामे करण्यासाठीच व्हावा हा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे गावपातळीपासून ते राज्यस्तरापर्यंतच नव्हे, तर देशपातळीपर्यंत कामांच्या बाबतीत दर्जेदारपणाबाबत ते कसलीही तडजोड करीत नाहीत.
महाराष्ट्रासारख्या सामाजिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या राज्यात शिक्षणाची रचना आणि त्याची अंमलबजावणी ही केवळ संस्थात्मक निर्णयांवर आधारित असू शकत नाही. शिक्षण ही सर्वसामान्यांच्या भविष्याची दिशा घडवणारी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच, शाळा, महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी आणि शासन यांच्यातील परस्परसंबंध अत्यंत निर्णायक ठरतो. या परस्पर संबंधांच्या समतोल व्यवस्थापनातूनच शिक्षणव्यवस्थेचा खरा अर्थ प्रकट होतो.अजित पवार यांनी याच तत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून शिक्षणाच्या पुनर्रचनेचा व्यापक आराखडा मांडला. त्यांच्या दृष्टीने शाळा ही केवळ इमारत नाही, ती एक विचारपद्धती आहे. शिक्षक म्हणजे माहिती देणारा नसून विचारांचे पथदर्शक आहेत. विद्यार्थी म्हणजे गाठायचा टप्पा नव्हे, तर घडवायचा माणूस आहे. आणि शासन म्हणजे नुसते निधीपुरवठ्याचे यंत्र नव्हे, तर एक उत्तरदायित्व असलेली संस्था आहे. आजचा काळ हा चौथ्या औद्योगिक क्रांतीचा आहे.
तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि डिजिटल नेटवर्किंग यामधील बदल इतक्या वेगाने होत आहेत की पारंपरिक शिक्षणपद्धती त्यापुढे अपुरी ठरू लागली आहे. अशा वेळी शिक्षण व्यवस्थेला काळाच्या गरजेनुसार सजग ठेवणं, ही शासनाची आणि शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वकर्त्यांची अत्यावश्यक जबाबदारी बनते.अजित पवार यांनी ही गरज लवकर ओळखली. त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये “डिजिटल शिक्षण म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांना सशक्त बनविण्याचं माध्यम आहे” हा विचार सर्वाधिक ठळकपणे दिसतो. त्यांनी शाळा आणि महाविद्यालये ही केवळ अध्यापनाची केंद्रे न ठेवता, त्या ठिकाणी ज्ञान-निर्मिती, जीवनकौशल्य विकास आणि मूल्यसंस्कार या घटकांचा समावेश केला. त्यामुळेच त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये केवळ ‘शिकवणूक’ नाही, तर ‘घडवणूक’ आहे.
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल यावर त्यांचा भर असतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा व वारसा तसेच बाबूरावजी घोलप यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून पुढे घेऊन जाताना दिसतात. यासाठी पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणावर कसा भर देता येईल असे विचारही दादा नेहमी मांडत असतात. रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, विद्या प्रतिष्ठान, छ.शाहू महाराज मराठा शिक्षण परिषद अशा अनेक नामवंत शिक्षण संस्थांमध्ये व्यवसायानुरूप, नव्या कौशल्यानुरूप अभ्यासक्रम शिक्षण क्षेत्रात सुरू केले आहेत.
नविन शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीसाठी या संस्था अग्रभागी आहेत. त्यांच्या सामाजिक आणि सास्कृतिक विचारांमुळे शैक्षणिक क्षेत्राला नवा परीसस्पर्श झाला आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळासारख्या बहुजन समाजाच्या शैक्षणिक संस्थेचा प्रचंड गुंतागुंतीचा व्याप, संस्थेसमोर अनेक समस्या उभ्या असताना संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारली आणि संस्थेची विस्कटलेली घडी, प्रशासनात आलेली मरगळ त्यांच्या सुयोग्य नियोजन, निर्णयप्रक्रियेमुळे, शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे केवळ एक-दीड वर्षात जागेवर आली. जिल्हा शिक्षण मंडळात खर्चाचा कोणताही विचार न करता नव्या शाळा-महाविद्यालयांच्या इमारती, नवनवीन अभ्यासक्रमांच्या शाखा, तांत्रिक- अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम, वैद्यकीय, औषधनिर्माण महाविद्यालये त्यांच्या पुढाकाराने आकाराला आल्या, संस्था प्रशासनातही सुसूत्रता आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीनंतर अजितदादांची अध्यक्षपदाची वाटचालही संस्थेला ‘अ दर्जाकडे नेणारी ठरली आहे.
शाळांचे आधुनिकीकरण :
बदलत्या शिक्षणसंस्कृतीचा पायाराज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची परिस्थिती काही ठिकाणी दुर्दशाग्रस्त होती. साधनसामग्रीचा अभाव, शिक्षकांची कमतरता, अभ्यासक्रमातील कालबाह्यता, विद्यार्थ्यांची गळती यांसारख्या अनेक समस्यांनी ग्रामीण भागातील शाळा प्रभावित होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ‘शाळा ही समाजाचा आत्मा असते’ या विचाराने प्रेरित होऊन शिक्षणाच्या गाभ्यात प्रवेश केला.त्यांनी शाळांच्या इमारतींचे आधुनिकीकरण केलेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे शिक्षणपद्धती आणि अध्यापनशैलीत परिवर्तन घडविले. स्मार्ट बोर्ड, संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररी, आणि शिक्षकांसाठी डिजिटल प्रशिक्षण सत्रे—या साऱ्याचा संगम त्यांनी घडविला. हे करताना त्यांनी जिल्हानिहाय गरजेनुसार शाळा विकास आराखडा तयार केला.विशेषतः ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गळती जास्त होती, तेथे ‘शाळा-मुलं-मुली-गाव’ या चौकटीतून संपूर्ण समाज शिक्षण प्रक्रियेत सहभागी होईल अशी पद्धत विकसित केली गेली. शिक्षण हे केवळ संस्थेचे कार्य नसून समाजाचेही उत्तरदायित्व आहे, ही भावना रुजवण्यात अजित पवार यशस्वी ठरले.
महाविद्यालयीन शिक्षणाचे वास्तव आणि नवसंस्थापन
महाविद्यालय हे केवळ पदवी वितरणाचे केंद्र नसावे, तर ते संशोधन, कौशल्यविकास व सामाजिक प्रबोधनाचे केंद्र बनावे, असा अजित पवार यांचा विश्वास आहे. त्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागात अनेक नवीन महाविद्यालयांची स्थापना झाली.ते म्हणतात, “ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जर त्यांच्या गावीच गुणवत्तापूर्ण महाविद्यालय उपलब्ध झाले, तर समाजातली शक्ती गावातच रोवली जाईल.” याच दृष्टिकोनातून त्यांनी महिला महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, फार्मसी, अभियांत्रिकी आणि वाणिज्य शाखांचे उच्च शिक्षण केंद्रे कार्यान्वित केली.महाविद्यालयांमध्ये उद्योगांशी संलग्न अभ्यासक्रम, स्टार्टअप इनक्युबेशन सेल्स, भाषा प्रयोगशाळा व करिअर मार्गदर्शन केंद्रे यांचा आरंभ करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षमतेच्या दृष्टीने सक्षम बनवले. हे करताना त्यांनी फक्त नवीन संस्थांची स्थापना केली नाही, तर विद्यमान महाविद्यालयांचे दर्जात्मक मूल्यांकन व सुधारणा केली.
विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू:
शासनाचे कोणतेही धोरण असेल, त्याचा शेवटचा प्रभाव विद्यार्थ्यावर पडतो. म्हणूनच विद्यार्थी ही शिक्षण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची कडी आहे. अजित पवार यांनी विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून शिष्यवृत्ती योजना, सायकल वाटप, ड्रेस कोड, वह्या वाटप, डिझिटल लर्निंग साधने आणि स्कूल बॅग लाइट व्हावी यासाठी प्रयत्न केले.त्यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा भार कमी करत ‘मूल्याधिष्ठित शिक्षण, प्रयोगशीलता व सहभागितेवर आधारित शिक्षण’ अशा नवीन पद्धती रुजवल्या. राज्यातील ई-क्लासरूम्स, ऑनलाईन अभ्याससामग्री, ई-लायब्ररी, मोबाईल अॅप्स हे सर्व विद्यार्थ्यांचे डिजिटल सशक्तीकरण घडवून आणण्यासाठी प्रभावी ठरले.संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान जपणे आणि त्यांचे स्वाभिमान टिकवून ठेवणे हेच त्यांचे मूळ धोरण राहिले आहे. परीक्षा आधारित शिक्षण न ठेवता ‘जीवनाधारित शिक्षण’ देणे, ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे.
शिक्षकांचे स्थान आणि त्यांच्या प्रशिक्षणाची व्याप्ती
शिक्षक ही केवळ माहिती देणारी व्यक्ती नसून, ती समाज बदलवणारी शक्ती आहे, हे अजित पवार यांचे स्पष्ट मत आहे. शिक्षकांना गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी त्यांनी अनेक प्रशिक्षण उपक्रम सुरू केले. नवशिक्षकांचे इंडक्शन ट्रेनिंग, शिक्षकांच्यापदोन्नतीतील गुणवत्तेचा निकष, Teaching Learning Material (TLM) साठी स्वतंत्र निधी, डिजिटल टूल्सवर प्रशिक्षण अशा सर्व गोष्टी राबवण्यात आल्या.त्यांच्या कार्यकाळात शिक्षकांसाठी वेगवेगळ्या विषयांवर ब्लेंडेड लर्निंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाईन वेबिनार्स, विषयतज्ज्ञांशी संवाद, स्वयं-अभ्यास मॉड्यूल्स यामुळे शिक्षकांचं शिक्षणातलं स्थान केवळ ‘गुरु’ ते ‘मार्गदर्शक’ असं न राहता ‘बदल घडवणारा सहप्रवासी’ बनलं.शिक्षकांच्या कार्यक्षमतेचं मूल्यमापन करताना त्यांनी केवळ निकाल नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सहभाग, अभ्यासातील स्वारस्य, प्रयोगशीलता आणि समाजसाक्षरता हे घटकही समाविष्ट केले. शिक्षकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून त्यांच्या अनुभवांचा अभ्यासक्रमात उपयोग होईल अशी व्यवस्था त्यांनी केली.
शासनाचे धोरण : केवळ योजना नव्हे, तर कृतीशीलता
कोणतेही धोरण हे कागदावर ठेवल्याने समाजपरिवर्तन घडत नाही. त्यासाठी ज्या पातळीवर गरज आहे, त्या पातळीवर कृती घडवावी लागते. अजित पवार यांनी शिक्षण धोरणाची आखणी करताना केवळ बजेटवर भर न देता, त्या निधीच्या कार्यक्षम वापरावर अधिक लक्ष केंद्रित केले.‘विद्यार्थी केंद्रित शिक्षण’, ‘शिक्षक प्रोत्साहन मॉडेल’, ‘शाळा व्यवस्थापन समित्या’, ‘स्थानिक शासन संस्था’ यांचा समन्वय साधून त्यांनी कार्यप्रणालीत पारदर्शकता आणली. शासनाच्या विविध योजनांमध्ये (उदा. सर्वशिक्षा अभियान, समग्र शिक्षण अभियान, RUSA, NAAC मूल्यांकन) त्यांनी केवळ अनुपालन नव्हे, तर सुधारणा या बिंदूपासून कार्य केले.अनेक योजनांमध्ये DBT (Direct Benefit Transfer) प्रणाली लागू करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वह्या, गणवेश, प्रवास सवलत थेट मिळावी यासाठी सुधारणा केल्या. यामुळे प्रशासन व पालक यांच्यात विश्वास वाढला. हे धोरण शाळा आणि महाविद्यालयांमधील सहभाग, विश्वास आणि कार्यक्षमता वाढवणारे ठरले.
शिक्षण ही केवळ शैक्षणिक प्रक्रिया नसून ती एक व्यापक सामाजिक बदल घडविणारी शक्ती आहे. यासाठी शाळा ही संस्कृती निर्माण करणारी संस्था असते, महाविद्यालय ही देशाचे विचार घडवणारी प्रयोगशाळा असते, विद्यार्थी हे समाजाचे भविष्य असतात, शिक्षक हे परिवर्तनाचे बिंदू असतात आणि शासन ही दिशा देणारी संस्था असते.अजित पवार यांच्या आधुनिक शैक्षणिक धोरणात या सर्व घटकांमध्ये परस्परावलंबित्व आहे. त्यांनी राबवलेले धोरण हे केवळ “एकत्रित शिक्षणव्यवस्था” नसून, ती एक “समूहशक्तीवर आधारित परिवर्तनप्रक्रिया” आहे. त्यांनी दाखवलेले शिक्षणविषयक नेतृत्व हे केवळ योजनांवर आधारित नव्हे, तर मूल्य, दृष्टी आणि कृती यांचं परिपाक आहे.
डिजिटल शिक्षण : ग्रामीण भारताच्या सशक्तीकरणाची दिशा
ग्रामीण भागात डिजिटल शिक्षण ही केवळ तांत्रिक बाब नव्हे, ती सामाजिक समावेशाची चळवळ आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यातल्या अनेक जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘स्मार्ट क्लासरूम्स’, ‘डिजिटल लायब्ररी’, ‘ऑनलाइन अभ्यासमालिका’, संगणक उपकरणे, प्रोजेक्टर, व्हर्चुअल लर्निंग यंत्रणा यांचे प्रस्थ वाढले.हे करताना त्यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या :
भौतिक पायाभूत सुविधा (hardware) : संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड.
सॉफ्टवेअर व शिक्षण साहित्य : शालेय अभ्यासक्रमानुसार ई-कन्टेन्टची निर्मिती.
शिक्षकांचे प्रशिक्षण व वापराची सवय : शिक्षकांना डिजिटल तंत्रज्ञान वापरण्याचे प्रशिक्षण
त्यामुळेच कोविडच्या काळात जेव्हा शाळा बंद होत्या, तेव्हा महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी Zoom, Google Classroom, Diksha App यांद्वारे शिकत होते. यामागे अजित पवार यांनी आधीपासूनच घडवलेली यंत्रणा कारणीभूत ठरली.शाळांमध्ये वापरले जाणारे ‘डिजिटल टूल्स’ हे विद्यार्थ्यांच्या वयाशी, गरजेशी आणि सामाजिक पार्श्वभूमीशी सुसंगत असावेत, हा दृष्टिकोन धोरणात्मक होता. यामुळे शिक्षण फक्त शहरकेंद्रित राहिलं नाही.
महाविद्यालयांमध्ये ई-शिक्षण आणि संशोधनदृष्टिकोन
महाविद्यालयीन शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर अजित पवार यांनी केवळ डिजिटल नोट्स किंवा PPT पर्यंत मर्यादित ठेवला नाही. त्यांनी उच्च शिक्षणात ‘मोउक लर्निंग प्लॅटफॉर्म्स’, ‘MOOCs’, ‘व्हर्चुअल लॅब्स’, ‘इंटरनॅशनल वेबिनार्स’, ‘ई-संशोधन जर्नल्स’ यांचा पाठपुरावा केला.त्यांनी विद्यापीठांना निर्देश दिले की, शैक्षणिक शिस्तीत विविध डिजिटल संसाधनांचा अनिवार्य समावेश असावा. यामुळे संशोधन आणि डेटा-आधारित शिक्षणाला चालना मिळाली. महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये आभासी प्रयोगशाळा, ऑनलाइन जर्नल सब्स्क्रिप्शन, प्रोग्रॅमिंग कोड लर्निंग सॉफ्टवेअर्स यांचा वापर वाढला.
हे सर्व करताना त्यांनी शिक्षकांना मागे न ठेवता ‘Teacher as Facilitator’ या संकल्पनेवर भर दिला. यामुळे विद्यार्थी आत्मकेंद्रित न होता, ‘सहभागी शिक्षण’ पद्धतीचा अनुभव घेऊ लागले.
मूल्यशिक्षण आणि सामाजिक जाणीवा :
शिक्षणाचे आत्मिक रूपडिजिटल युगात यांत्रिक झालं, हा आरोप अनेकदा केला जातो. परंतु अजित पवार यांनी शिक्षणात मूल्यसंस्कार रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक उपाययोजना केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाने शाळांमध्ये ‘मूल्यशिक्षण उपक्रम’, ‘साप्ताहिक चर्चा’, ‘ग्रामदर्शन’, ‘स्वच्छता अभियान’, ‘समाजोपयोगी सेवा योजना’ यांसारख्या कृतीशील कार्यक्रमांना प्रोत्साहन दिलं.शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ईमानदारी, सहिष्णुता, सामाजिक एकात्मता, पर्यावरण-जागरूकता हे घटक वाढवण्यासाठी कार्यक्रम राबवले गेले. विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम शिक्षकांच्या सहभागातून, शाळांच्या सल्लागार मंडळांद्वारे घडवले गेले.महाविद्यालयांमध्ये NSS, NCC, वाचनसंघ, चर्चाविषयक मंडळे, युवा महोत्सव यांच्यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, संवेदनशीलता व समजूतदारी वाढवण्यात आली. हे शिक्षण मूल्याधारित आहे, याचे उदाहरण ठरते.
कौशल्य विकास :
शिक्षण आणि रोजगार यामधील दुवा, शिक्षणाचे अंतिम लक्ष्य हे रोजगारक्षम व आत्मनिर्भर नागरिक घडवणे, असे अजित पवार यांचे स्पष्ट मत आहे. त्यांनी राज्यभरात कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे, शॉर्ट टर्म कोर्सेस, इंटरनशिप प्रोग्रॅम्स, इंडस्ट्री अॅकॅडेमिया पार्टनरशिप, आणि उद्योजकता प्रशिक्षण या सर्व गोष्टी राबवल्या.ते म्हणतात की, “पदव्या देणं महत्त्वाचं नाही, तर रोजगारक्षमतेसाठी आवश्यक कौशल्य देणं अधिक महत्त्वाचं आहे.” यासाठी शिक्षण आणि उद्योग यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कॉर्पोरेट रिलेशन सेल्स, प्लेसमेंट सेल्स, इंडस्ट्री एक्सपर्ट लेक्चर्स यांचं आयोजन झालं.IT, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मसी, अॅग्री-बिझनेस, टुरिझम, हेल्थकेअर, लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमध्ये कोर्सेस सुरू करण्यात आले. शिक्षणासोबतच व्यवहार कौशल्य (soft skills), इंग्रजी संभाषण, डिजिटल साक्षरता, संवाद कला, उद्योजकता मानसशास्त्र यांनाही धोरणात मान्यता देण्यात आली.
साहित्य आणि शिक्षण क्षेत्र :
अजितदादाहेसार्वजनिक जीवनातील एक हळवे आणि समर्पित परिमाण आहे. त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणांत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, शाहू, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई यांच्या विचारांचा उल्लेख केलाय – तो केवळ नामघोषापर्यंत मर्यादित नाही, तर त्यांनी त्यांच्या विचारसरणीलाधोरणात्मक स्वरूप दिलं आहे.शाळा, महाविद्यालयं, वसतिगृहं, पुस्तकालयं, संशोधन संस्था, ज्ञानसंपन्न संग्राहालयं उभारण्यामागे अजितदादांची वैचारिक बैठक स्पष्टपणे दिसते. त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशात नव्या संस्था निर्माण केल्या त्याकेवळ इमारती उभारून नव्हे, तर त्यामध्ये दर्जा, व्यवस्था आणि आधुनिकतेची समरसता निर्माण करून.त्यांनी महाराष्ट्रात शालेय शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षण, कृषी शिक्षण, आणि महिला शिक्षणासाठी नवीदृष्टी दिली. खासगी आणि शासकीय यंत्रणांना एकत्र आणून ‘शिक्षण’ हा समाजोदयाचा केंद्रबिंदू ठरावा, यासाठी त्यांनी राबवलेली धोरणं उल्लेखनीय आहेत.
क्रीडा क्षेत्र : अजितदादांचे हे खूप व्यापक दूरदृष्टिकोन असलेलेलेक्षेत्र आहे. युवक आणि समाजा यांना त्यांनी येथे केंदस्थानी ठेवले आहे. खेळाडू म्हणजे केवळ मैदानावरचा performer नाही, तर तो एका सशक्त समाजाचे प्रतिनिधी असतो – हे लक्षात घेत ‘खेल महोत्सव’, ‘जिल्हास्तरीय स्पर्धा’, ‘ग्रामीण क्रीडांगण’, ‘तालुका क्रीडासंकुल’, ‘व्यक्तिगत प्रोत्साहन निधी’ अशा योजनांची कल्पक रचना केली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ दरवर्षी बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडांगणात ‘क्रीडा महोत्सवाचे’आयोजन करीत असते. येथेच पुणे आणि बारामतीसारख्या परिसरातून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तर गाठला, याचे मोल अजितदादांच्या पाठबळात आहे.त्यांच्या क्रीडाप्रेमात कुस्ती, हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल या सांघिकसह अथल्याटिक्स स्पर्धाचा समावेश आहे. त्यांनी युवकांना ‘खेळांमधून नेतृत्व, शिस्त, आणि संघर्षातील चिकाटी’ शिकवण्याचा संदेश दिला. ‘खेळ ही केवळ शरीरवृद्धी नाही, ती समाजघटनाही आहे’ – ही त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या क्रीडाव्यवस्थेचा गाभा बनते आहे.
या सर्व कार्यांचे प्रतिबिंब आज सार्वजनिक स्मरणशक्तीत अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वासोबत घट्टपणे रुजलेलं आहे. लोकांच्या मनात अजितदादा म्हणजे ‘न थांबणारा आणि न झुकणारा’ नेता. जनतेच्या स्मृतीत त्यांचं स्थान केवळ निर्णयकर्त्याचं नाही, तर ‘उपस्थित राहणाऱ्या, ऐकणाऱ्या, आणि उत्तरदायी’ नेतृत्व म्हणून आहे. अनेकदा ग्रामीण भागातल्या वृद्ध महिलांच्या तोंडून आपण ऐकतो – “आपले दादा आले होते, त्यांनी शंभर टँकर पाठवले.”, “दादांनी शाळेची नवीन खोली करून दिली.”, “दादांनी आमच्या मुलीचं हॉस्टेल सुरू केलं.”ही उदाहरणं आकडेवारीत नसतात, ती लोकांच्या काळजात असतात. आणि हीच खरीलोकनेतेपणाची कसोटी असते. ‘लोक तुम्हाला त्यांच्या चुकांमुळे नाही, तर त्यांच्या जीवनात दिलेल्या आश्रयामुळे आठवत असतात’या आठवणींमुळेच अजितदादांचा संपूर्ण महाराष्ट्रभर कार्याचा सर्वाधिक ठसा उमटलेला आहे.
भविष्यातील दिशा :
कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित शिक्षण आणि जागतिकीकरणशिक्षण हे स्थिर नसून, ते सातत्याने विकसित होत असते. याची जाणीव ठेवून अजित पवार यांनी शिक्षणाच्या भविष्यासाठी काही दिशा ठरवल्या आहेत :
AI (Artificial Intelligence) आधारित शिक्षण : विद्यार्थ्यांच्या गतीनुसार अभ्यासक्रम सादर करणाऱ्या अॅप्सना प्रोत्साहन.
Green Education :पर्यावरणशास्त्र, जैवविविधता, ऊर्जा संवर्धन यांची शाळांमध्ये अध्यापनातून समाविष्ट.
International Academic Collaborations :आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करून संशोधन व प्रशिक्षणासाठी संधी.
Inclusive Learning :दिव्यांग, विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ICT आधारित लर्निंग टूल्स.
Edu.Techस्टार्टअप्सना चालना : नव्या शिक्षणतंत्रज्ञान प्रकल्पांसाठी स्टार्टअप पारिस्थितिकी तयार करणे.
या सर्व गोष्टींमधून एक गोष्ट स्पष्ट होते की शिक्षण धोरण हे केवळ आजचे नव्हे, तर उद्याचेही लक्षात ठेवून तयार केले पाहिजे. आणि हे करताना विद्यार्थी, शिक्षक, शाळा, महाविद्यालय व शासन ही पाचही केंद्रे समतोल ठेवली गेली पाहिजेत.
खरतर अजितदादा पवार यांनी शिक्षण क्षेत्राला केवळ निधीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमध्ये न ठेवता, ते मूल्यनिर्मिती, स्वयंपूर्णता व मानवतावादी दृष्टिकोनातून सशक्त करणारे क्षेत्र बनवले. त्यांचा दृष्टिकोन हा केवळ राजकीय नव्हता, तर तो सामाजिक बांधिलकीने प्रेरित होता.डिजिटल शिक्षण, मूल्यसंस्कार, कौशल्य विकास आणि भावी दिशा या सर्व घटकांच्या मांडणीतून त्यांची ठळकता दिसून येते. शिक्षणाला एकात्मिक, परिणामकारक व दूरदृष्टीसंपन्न असा आराखडा त्यांनी दिला.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे, यामागे केवळ एक नेत्याचा गौरव नाही, तर त्यातून एक कृतिशील व्यवस्थापक, लोकनायक, आणि विचारशील महाराष्ट्राचा नेता म्हणून त्यांना सलाम आहे.
अशा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा!
– एम. जी. ताकवले (माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर)





