Pune District : मुस्लीम समाजाने निधीचा योग्य वापर करावा

बारामती : मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे मुस्लीम समाजाला मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून आपआपले व्यवसायात उन्नती करावी. असे प्रतिपादन खासदार सुनेत्रा पवार यांनी केले.
बारामतीत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे धनादेश वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन मुशताक अंतुले, संचालक सलिम सारंग, कार्यकारी संचालक गफार मगदूम, राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, माळेगावचे उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अविनाश बांदल, बारामती बँकेचे संचालक ॲड. शिरीष कुलकर्णी, दिलीप ढवाण, नितीन शेंडे, तैनुर शेख, महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड, माजी नगरसेविका अनिता जगताप, सविता जाधव, यास्मीन बागवान उपस्थित होते.
त्या म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने बारामतीतील छोट्या व्यावसायिकांना 3 लाखांची रक्कम मिळाल्याने त्यांच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे. रकमेचा योग्य वापर करून त्याची मुदतीत परतफेड करावी. दिलेला शब्द पाळणारे अजित पवार आहेत, हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आलताफ सय्यद व त्यांच्या एकता ग्रुपचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी मुशताक अंतुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी 221 व्यावसायिकांच्या वतीने आलताफ सय्यद यांचा सत्कार खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. योजनेसाठी सहकार्य करणाऱ्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार खासदार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. आलताफ सय्यद यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कमरूद्दीन सय्यद यांनी केले. सुभान कुरैशी यांनी आभार मानले.





