श्रीगोंद्यातील भूमिपुत्रांचा राज्य व देश पातळीवर वाजला डंका..

अर्शद आ शेख
श्रीगोंदा – महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मागील सहा दशकात तालुक्यातील अनेक भूमिपुत्रांनी राजकीय पटलावर राज्य व देशपातळीवर आपल्या नेतृत्वाचा डंका वाजविला. जवळपास पाच प्रमुख पक्षांना या तालुक्याने प्रदेशाध्यक्षपद पुरविले. एवढेच नव्हे तर पंतप्रधानांच्या निकटवर्तीयात श्रीगोंदेकरांचा समावेश होता.
या यादीत सर्वात पहिले नाव आहे ते समाजवादी नेते व ‘युक्रांद’चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे. ते श्रीगोंद्याचे भूमिपुत्र. मांडवगण (ता. श्रीगोंदा) ही त्यांची जन्मभूमी. जनता पक्ष, जनता दल व पुढे समाजवादी जनता दल यांचे राज्य पातळीवरील नेतृत्व त्यांनी केले. युवक क्रांती दलाचे ते संस्थापक व राज्याचे सर्वेसर्वा आहेत.
चंद्रशेखर हे पंतप्रधान असताना डॉ. सप्तर्षी त्यांच्या निकटवर्तीय व विश्वासू सहकाऱ्यापैकी होते. त्यानंतर माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी राज्य युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्षपद 1985 साली पटकावले होते. नंतर ते 1999 ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाले. तेव्हा नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादीला खेडोपाड्यात पोहोचविण्यात पाचपुते यांचा सिंहाचा वाटा होता. पाचपुते यांच्या नंतर घनश्याम शेलार यांनी देखील राज्यपातळीपर्यंत मजल मारली. भाजप युवा मोर्चाचे ते 1998 ला प्रदेशाध्यक्ष झाले. मात्र प्रमोद महाजन यांच्या हस्तक्षेपाने त्यांना हे पद सोडावे लागले. नंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस, नंतर राज्य उपाध्यक्ष म्हणून काम केले.
शेतकरी संघटनेचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष असलेले अनिल घनवट यांचे नाव यात अग्रेसर आहे. “ग्रासरूट’ कार्यकर्ता पासून ते शरद जोशीं चे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी मारलेली मजल लक्षवेधी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते राज्यभर श्रीगोंद्याचे नाव चमकवत आहेत. शेतकरी संपामुळे राज्यभर चर्चिले गेलेले जयाजीराव सूर्यवंशी हे देखील श्रीगोंदा मतदारसंघातील. गुरव पिंपरी हे त्यांचे गाव. पूर्वी ते श्रीगोंदा मतदारसंघात होते. आता कर्जतमध्ये आहे.
श्रीगोंदा मतदारसंघातून राष्ट्रीय पातळीवर झळकलेल्या नेत्यात माणिकराव पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ते देखील श्रीगोंदा मतदारसंघातील मिरजगावचे. (आता हे गाव कर्जत-जामखेड मतदारसंघात आहे) माणिकराव पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रमुख तर होतेच, शिवाय ते संघाचे पश्चिम भारताचे सरसंघचालक देखील झाले. ऍड. राजाभाऊ झरकर यांनीही राज्यपातळीवर जनसंघाचे व भाजपचे नेतृत्व केले होते. देशाच्या राजकारणात सध्या चमकणारा उदयोन्मुख तारा म्हणजे हेमंत ओगले.
राहुल गांधींच्या अतिशय विश्वासू सहकाऱ्यांपैकी ते एक आहेत. दिग्विजयसिंह, सुशीलकुमार शिंदे, सचिन पायलट, अहमद पटेल यांच्या ते नित्य संपर्कात असतात. पंजाब व गोव्याचे प्रभारी म्हणून त्यांनी कॉंग्रेससाठी काम केले. दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी देखील देशपातळीवरील नॅशनल हेवी इंजीनियरिंग लिमिटेडवर संचालक म्हणून ठसा उमटविला. राज्य साखर संघाचे अध्यक्षपद भूषविताना श्रीगोंद्याचा डंका चहुकडे वाजविला.
राज्य पातळीवर नेतृत्व केलेले आणखी एक नाव म्हणजे बाळासाहेब नहाटा. राष्ट्रीय समाज पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. तिथून बाहेर पडल्यावर आमदार बच्चू कडू यांच्या जनशक्ती प्रहारचे देखील त्यांनी राज्यस्तरीय नेतृत्व केले होते. जुन्या पिढीतील बाबुराव भारस्कर यांनी मंत्रीपदानंतर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे राज्याचे अध्यक्षपद सांभाळले. बिगर राजकीय संघटन असलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्षपद येथील बाबुमिया बॅंडवाले यांनी दीर्घकाळ भूषविले होते.
जगताप यांनाही मिळणार प्रदेशाध्यक्षपद?
तालुक्यातील या भूमिपुत्रांनी राज्यपातळीवर मोहोर उमटविली. त्यात आणखी एक नाव जोडले जाईल ते मावळते आमदार राहुल जगताप यांचे. आमदारकीची उमेदवारी नाकारूनही पक्षाशी इमान राखण्याचे बक्षिस त्यांना राष्ट्रवादीकडून मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद त्यांना दिले जाणार असल्याची कुणकुण “प्रभात’ला लागली आहे.





