कात्रज-स्वारगेट रस्ता सर्वांत महागडा

11 वर्षांत महापालिकेकडून 204 कोटी खर्च : वर्षाकाठी 20 कोटी खर्च झाल्याचे उघड
पुणे -महापालिकेच्याहद्दीतील कात्रज-स्वारगेट रस्ता हा शहरातील सर्वांत महागडा रस्ता ठरला आहे. कारण 2008 ते 2019 या 11 वर्षांच्या कालावधीत या रस्त्यावर महापालिकेकडून तब्बल 204 कोटीचा खर्च करण्यात आल्याची बाबसमोर आली आहे. त्यामुळे या रकमेची सरासरी पाहता या रस्त्यावर वर्षाला तब्बल 20 कोटींचा खर्च होत असल्याचे वास्तव आहे. बीआरटी आणि पदपथ दुरूस्ती तसेच उड्डाणपुलांसाठी हा खर्च झालेला आहे.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2008 मध्ये या रस्त्यावर केंद्राच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली. त्यात प्रामुख्याने पायलट बीआरटी प्रकल्पाचा समावेश होता. त्यामुळे 2008 ते 2014 पर्यंत हा रस्ता महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडे विकासकामासाठी देण्यात आला. या विभागाकडून या कालवधीत बीआरटी मार्ग, भुयारी मार्ग तसेच उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल 128 कोटी 58 लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.
हस्तांतरानंतर 75 कोटी 37 लाखांचा खर्च
हा रस्ता पुन्हा 2015 मध्ये महापालिकेच्या पथ विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर पथ विभागाकडून 2015 ते 2019 या कालावधीत तब्बल 75 कोटी 37 लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यात स्मार्ट स्ट्रीट संकल्पनेंतर्गत बीआरटी मार्गाची पुनर्रचना, लेनसाठी रूंदीकरण, पदपथ, सायकल ट्रॅक, पब्लिक स्पेस तसेच सुशोभिकरणाच्या कामासाठी खर्च करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 11 वर्षांतील झालेला हा 204 कोटींचा खर्च पाहता या रस्त्यावर वर्षाला सरासरी 19 ते 20 कोटींचा खर्च होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
2008 ते 2014 प्रकल्प विभागाने केलेला खर्च : 128 कोटी 58 लाख
2015 ते 2019 मध्ये पथ विभागाने केलेला खर्च : 75 कोटी 37 लाख





