Nagar | रस्त्याप्रश्नी सुरू असलेले उपोषण चार दिवसानंतर सुटले

खेड, (वार्ताहर): खेड-शिंपोरा-मानेवाडी रस्त्याचे ठेकेदाराने बंद केलेले काम तत्काळ सुरू करावे तसेच आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी पी.व्ही.आर.पी.एल. कंपनीच्या जड वाहतुकीमुळे खराब झालेल्या करपडीफाटा ते बाभूळगाव दुमाला दरम्यानच्या १० किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण मागण्या मान्य झाल्याने अखेर चार दिवसानंतर सुटले.
राहुल भोसले, हेमंत काळे, प्रशांत उर्फ पप्पू गायकवाड, महेंद्र काळे, शहाजी माने, अमोल चव्हाण या उपोषणकर्त्यांना आ.रोहित पवारांच्या हस्ते शीतपेय देऊन उपोषण सोडण्यात आले.
सोमवार (दि.२३ पासून) उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांचीही कोणीच दखल घेत नसल्याने शिंपोरा-बाभूळगाव-मानेवाडी गावच्या ग्रामस्थांनी राज्यमार्गावर करपडी फाटा येथे आक्रमक होत दि.२६ रोजी रास्तारोको आंदोलन केले होते.
पहिल्या मागणीत ठेकेदाराने बंद ठेवलेले काम उद्यापासूनच सुरु होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे रास्तारोको आंदोलन थांबवले, मात्र १० किमी सिमेंट रस्त्याच्या मागणीचा तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच ठेवण्यात आले होते.
आ.रोहित पवार व खा.नीलेश लंके आणि आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित मागणीवरही तोडगा निघाला.
‘जोपर्यंत दहा कि.मी सिमेंट रस्ता होणार नाही, तोपर्यंत आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी सुरू असलेली वाहतूक थांबवली जाईल तसेच भू-अंतर्गत असलेल्या नलिकेचेही काम थांबवले जाईल, असे आश्वासन आष्टी सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिले.
आता त्याअनुषंगाने पुढील हालचाली सुरूही झाल्या आहेत. या दोन्हीही मागण्या मान्य झाल्याने अखेर दि.२६ रोजी रात्री ११ वाजता आ. रोहित पवारांच्या हस्ते आंदोलनकर्त्यांना शीतपेय देऊन उपोषण सोडण्यात आले. मागण्या मान्य झाल्याने या गावांचा संघर्ष आता संपणार असल्याने गावाकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सर्वांच्या खंबीर साथीमुळेच लढ्याला यश!
आंदोलन सुरू झाल्यापासून आ.रोहित पवार आणि खा.नीलेश लंकेंनी वेळोवेळी आमची विचारपूस करत संबंधित अधिकाऱ्यांशी रस्त्याबाबत चर्चा केली.
त्यांनी केलेला पाठपुरावा आणि शिंपोरा-मानेवाडी-बाभूळगाव ग्रामस्थांनी दिलेली मोलाची खंबीर साथ यामुळेच मागण्यांना यश आले. या सर्वांचे आम्ही जाहीर आभार मानतो.
-राहुल भोसले ,उपोषणकर्ते





