पुणे जिल्हा | शक्तीप्रदर्शन करीत अशोक पवार यांचा अर्ज दाखल

शिरूर, (वार्ताहर) – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांनी मोठी शक्तीप्रदर्शन करून खासदार संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे व खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत आज आपला उमेदवारी अर्ज भरला.
शिरूर विधानसभेची निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिला. सकाळी रासाई देवी वडगाव रासाई, श्री रामलिंग शिरूर व घरातील कुलदेवता नतमस्तक होऊन आमदार अशोक पवार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिरूर येथे आले.
शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार घालून प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस आय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी या चिन्हाची प्रतिकृती या रॅलीमधे सहभागी होती. तर महाविकास आघाडीचे मित्र पक्षांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे व मशाली चे फोटो व झेंडे तसेच काँग्रेसचे झेंडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे दिसत होते.
शिरूर-हवेली मतदार संघातून नागरिकांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळाली. शिरूर व हवेली तालुक्याचा विकास हे एकमेव ध्येय आम्ही कायम ठेवत आहे. समोरील महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाही.
कारण त्यांच्याकडे उमेदवार नसून ते आता एक आयात उमेदवार घेत आहेत. समोरचा उमेदवार कोणी असो मी माझ्या परीने मी केलेली विकास कामे घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलो आहे. -अशोक पवार, महाविकास आघाडीचे उमेदवार




